नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट

nashik

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदापार्क येथे पार्टी करणार्‍यांपैकी दीपक गोपीनाथ दिवे (27, रा. डीके नगर, गंगापूर रोड) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

गंगापूर रोडवरील गोदापात्र परिसरात बुधवारी (दि.9) दीपक दिवे हा त्याच्या मित्रांसह दुपारी मद्यपार्टी करत होता. मात्र, दीपक घरी न आल्याने त्याच्या नातलगांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दीपक बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दीपकसोबत पार्टीत सहभागी असणार्‍या संशयितांची चौकशी केली. पार्टीत सहभागी झालेल्यांनी सांगितल्यानुसार दीपकला फोन आल्याने तो मोबाइलवर बोलता बोलता निघून गेला होता. दरम्यान, रविवारी (दि.13) पोलिसांनी दीपकच्या मित्रांना चौकशीसाठी पुन्हा बोलावले होते, मात्र पार्टीत सहभागी असलेल्या दीपकचा मित्र विजय जाधव याने विषसेवन करून आत्महत्या केली. पोलिसांच्या जाचामुळे विजयने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला होता. दरम्यान, बुधवारी (दि.16) दीपकचा मृतदेह गोदापात्रात आढळला. गुरुवारी (दि.17) शवविच्छेदन केल्यानंतर दीपकचा गळा आवळल्याचे तसेच त्याच्या डोक्यास दुखापत आढळली. पाण्यात बुडाल्याने त्याच्या अवयवांमध्ये पाणी मिळून आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, चौकशीसाठी पार्टीत हजर असलेल्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक हा प्लंबर असून, विजय गवंडी कामे करायचा. तसेच, भुरट्या चोर्‍यांमध्येही तो संशयित होता. तर, आत्महत्या केलेल्या विजयविरोधात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

दीपक दिवे याचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
– किरणकुमार चव्हाण,
पोलिस उपआयुक्त, परिमंडळ एक

हेही वाचा :

The post नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट appeared first on पुढारी.