नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट असून, पाणीकपात अटळ असल्याने प्रशासकीय स्तरावर त्याबाबतचे गेल्या काही दिवसांपासून नियोजन केले जात आहे. वास्तविक एप्रिल महिन्यातच पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, राजकीय विरोधामुळे अधिकाऱ्यांमध्येच हा निर्णय कोण घेणार याची टोलवाटोलवी सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे.

पालकमंत्री दादा भुसे सोमवारी (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालयात धरणांतील उपलब्ध जलसाठा व त्याचे नियोजन याचा आढावा घेणार आहेत. बैठकीत जलसंपदा विभाग नाशिक मनपासह सर्व पाणीवापर संस्था पाणीवापराचे फेरनियोजन आराखडा सादर करणार आहेत. बैठकीत पालकमंत्री शहरातील पाणीकपातीबाबत निर्णय जाहीर करतात का, याकडेही लक्ष लागून आहे.

हवामान खात्याने ‘अल निनो’ संकटामुळे यंदा मान्सूनच्या आगमनास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता वर्तवली आहे. ते पाहता राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांना उपलब्ध पाण्याचे नियोजन व त्याचा वापर याबाबत आराखडा सादर करण्यास सांगितले. आवश्यक असल्यास पाणीकपातीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले. नाशिक शहराला ५८०० दलघफू पाणी आरक्षित असून, ते जुलैअखेरपर्यंत पुरवायचे असते. पण यंदा मान्सूनचे आगमन एक महिना लांबणीवर पडण्याचा इशारा पाहता मनपाला ३१ जुलैऐवजी ऑगस्ट अखेरपर्यंत उपलब्ध जलसाठ्यात तहान भागवायची आहे. एप्रिलपासूनच पाणीकपाती लागू होणार अशी चिन्हे होती. पण, अद्याप त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान शासनाच्या सूचनेनुसार पालकमंत्री पाणीवापर संस्थांची बैठक घेणार असून, फेरनियोजनाचा आढावा घेतील.

किती पाणीबचत करणे शक्य आहे याचा अंदाज घेतला जाईल. नाशिक शहरात पाणीकपातीच्या निर्णयावर पालकमंत्री या बैठकीत अंतिम निर्णय घेऊ शकतात असे समजते. दरम्यान, महापालिकेने संभाव्य जलसंकट पाहता गंगापूर धरणातून नियमित आरक्षणाव्यतिरिक्त अधिकचे दोनशे दलघफू पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे पत्राद्वारे केली होती. त्याबाबतही बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयुक्तांची परदेश वारी

पाणी कपातीबाबतचा निर्णय महापालिका आयुक्तांकडून घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु शनिवारी (दि. ६) मनपा आयुक्त एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला जात असल्याने, हा निर्णय कोण घेणार याकडे लक्ष लागून आहे. पालकमंत्री दादा भुसे स्वत: याबाबतचा निर्णय घेणार की अधिकाऱ्यांनाच याविषयीचे निर्देश देणार हे सोमवारच्या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक appeared first on पुढारी.