नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी

कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व परिसराला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपलेे. सकाळच्या ढगाळ हवामानानंतर दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. तर पावसामुळे नुकसान झाल्याने विक्रेत्यांच्याही डोळ्यांत पाणी आले.

अरबी समुद्रातील कमीदाबाचा पट्टा आणि राजस्थानमधून मान्सूनने सुरू केलेल्या परतीच्या प्रवासामुळे राज्यभरात पावसाने पुनरागमन केले आहे. नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (दि.३०) पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० ते ५ या कालावधीत जोरदार तर त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अधूनमधून सरी बरसल्या. सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात १५.५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तर पावसाच्या दणक्यामुळे कालिका यात्रोत्सवावरही पाणी फेरले गेले. मोठ्या अपेक्षेने विक्रीसाठी आणलेल्या मालाचेही मोठे नुकसान झाले. पावसामुळे भाविकांचीही गर्दी कमी झाल्याने विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे विक्रेत्यांच्याही डोळ्यांत पाणी आल्याचे जाणवले.

(सर्व छायाचित्रे- हेमंत घोरपडे)

जिल्ह्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. दिंडाेरी, पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत तो जोरदार बरसला. तर अन्य तालुक्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, पावसाने एकीकडे पुनरागमन केले असताना धरणांच्या विसर्गात घट करण्यात आली आहे. दारणाचा विसर्ग ५५० क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला. गंगापूरमधून सातत्याने २८५ क्यूसेक विसर्ग गोदापात्रात सुरू आहे. या शिवाय वालदेवीतून १८३, आळंदीतून ३०, पालखेडमधून ८७५ तर नांदूरमध्यमेश्वरमधून ५ हजार ५७६ क्यूसेक विसर्ग केला जात आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी appeared first on पुढारी.