नाशिक : पिंपळगाव बाजार समितीला दहा कोटींचा नफा

पिपंळगाव बसवंत www.pudhari.news

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा
शेतकरी हितासाठी काम करणार्‍या पिंपळगाव बाजार समितीची एक कोटी उत्पन्नापासून झालेली सुरुवात आजमितीस 20 कोटी रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे. बाजार समितीला 2021-22 या वर्षात 10 कोटींचा नफा झाला आहे. शेतकरी, कामगार घटकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार सभापती दिलीप बनकर यांनी दिली.

बाजार समितीच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक सुरेश खोडे, रामभाऊ माळोदे, निवृत्ती धनवटे, नंदू सांगळे, शंकरलाल ठक्कर, नारायण पोटे, विजय कारे, साहेबराव खालकर, अशोक निफाडे, शरद काळे, माधव ढोमसे, अश्विनी काळे, जिजाबाई खेलुकर, जयश्री पाटील, चिंतामण सोनावणे उपस्थित होते.
बनकर म्हणाले की, कोरोनासारखी महामारी असताना पिंपळगाव समितीने शेतकरी कामगार घटकांसाठी सोयी सुविधा पुरवल्या. लिलावासाठी शेतमाल घेऊन येणार्‍या शेतकरी, कामगार घटकांसाठी अवघ्या 10 रुपयांत किसान थाळी सुरू करून शेतकरी हित जोपासणारी उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली बाजार समिती ठरल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीचे सचिव संजय लोंढे यांनी 21-22 अहवालाचे वाचन करत उत्पन्न 21 कोटी 96 लाख, खर्च 11 कोटी वजा जाता 10 कोटी 95 लाख रुपयांचा नफा मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकरी तसेच कामगार वर्गासाठी भविष्यात सुविधा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती आजच्या या सर्व साधारण सभेत देण्यात आली.

…तर निसाकाही सुरू करू : कर्मवीरांच्या त्यागातून उभा राहिलेला व गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला निफाड सहकारी साखर कारखाना सुरू होणे ही काळाची गरज आहे. रानवड कारखाना सुरू झाला. त्याच धर्तीवर शासन स्तरावरून निसाकाचे टेंडर निघालेच, तर शासनाच्या ध्येय धोरणानुसार निफाड सहकारी साखर कारखानादेखील पिंपळगाव बाजार समितीच्या माध्यमातून ठराव करून भाडेतत्त्वावर चालविण्यास घेणार असल्याची ग्वाही सभापती दिलीप बनकर यांनी दिली.

काम कौतुकास्पद…
दिलीप बनकर यांचे कामकाज सुरुवातीपासूनच पारदर्शक राहिले.त्यांनी सभापतिपदाचा कारभार हातात घेतल्यापासून आजवर बाजार समितीच्या उत्पन्नात 20 टक्के वाढ झाले, हे दिलीप बनकर यांचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार संचालक रामभाऊ माळोदे यांनी काढले.

हेही वाचा:

The post नाशिक : पिंपळगाव बाजार समितीला दहा कोटींचा नफा appeared first on पुढारी.