नाशिक : पिंपळसोंड येथे धबधब्यावरुन पाय घसरुन दगडावर पडल्याने सुरत येथील विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशिक

सुरगाणा; वृत्तसेवा : पिंपळसोंड पैकी उंबरपाडा तातापाणी (गरम पाण्याचे झरे) येथील साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पंधरा फूटा वरुन खडकावर आपटल्याने विद्यार्थी पर्यटकाचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२३) दुपारी एक ते दीड सुमारास घडली. सुरत येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे १० ते १२ विद्यार्थी येथे सहलीसाठी आले होते. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव तक्षिल संजाभाई प्रजापती (वय १८) असे आहे.

याबाबत पिंपळसोंड येथील पोलिस पाटील रतन खोटरे यांच्याकडून समजले की, सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नोलॉजी या महाविद्यालयात दुस-या वर्षात शिकणारा युवक तक्षिल संजाभाई प्रजापती हा त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईंट धबधब्यावर अंघोळ करीत होते. यावेळी खडकावर शेवाळ असल्याने तक्षिलचा पाय घसरुन पंधरा फूट खाली खडकावर आपटला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत आदिवासी बचाव अभियानाचे कार्यकर्ते रतन चौधरी यांना कळविले असता त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप कोळी, नितीन ढेपलेसह वनविभागाचे वनरक्षक कर्मचारी अविनाश छगने, वामन पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर आणण्यात आला. पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी नारायण गावित, माजी सैनिक शिवराम चौधरी, साधु गावित, अनिल बागुल, रामदास गावित, जसे तुंबडा, सुरेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा :

The post नाशिक : पिंपळसोंड येथे धबधब्यावरुन पाय घसरुन दगडावर पडल्याने सुरत येथील विद्यार्थ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.