नाशिक- पुणे महामार्गावर जन-शिवनेरी सुसाट

जनशिवनेरी, ई शिवनेरी,www.pudhari.news

नाशिक : नितीन रणशूर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने व्होल्व्हो श्रेणीतील आरामदायी आणि वेगवान असलेली ई-शिवनेरी अर्थात जन-शिवनेरी नाशिक-पुणे मार्गावर उतरविली आहे. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, गेल्या २३ दिवसांमध्ये जन-शिवनेरीच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत ४२ लाखांची भर पडली आहे. दररोज सरासरी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न जन-शिवनेरीमुळे मिळत आहे.

एसटी महामंडळाकडून अत्यंत सुरक्षित, अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेली वातानुकूलन ई-शिवनेरी बससेवा मुंबईच्या बाहेर ‘जन-शिवनेरी’ या नावाने चालविण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर नाशिक-पुणे (शिवाजीनगर) या मार्गावर १ जुलैपासून विनावाहक सुरू करण्यात आलेल्या या जन-शिवनेरी बससेवेला प्रवाशांची पसंती मिळत आहे. या मार्गावर जन-शिवनेरीच्या दररोज १८ फेऱ्या होत असून, सरासरी एक हजार प्रवासी प्रवास करतात.

व्होल्व्हो आणि स्कॅनिया या कंपनीच्या अत्याधुनिक शिवनेरी बसेस अत्यंत माफक दरामध्ये नाशिक-पुणे या मार्गावर नाशिक आगार एक व पुणे आगारच्या प्रत्येकी १०’ जन-शिवनेरी’ या नावाने धावत आहेत. या बसचे नाशिक-पुणे (शिवाजीनगर) प्रवासाचे भाडे ५०० रुपये असून, महिलांना ५० टक्के सवलतीमुळे केवळ २५५ रुपयांत या बससेवेचा लाभ घेणे शक्य झाले आहे. प्रत्येक तासाला जन-शिवनेरी बस सुटत असल्याने प्रवाशांचा नाशिक-पुणे प्रवास आरामदायी होत आहे.

नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एसटीला नेहमी पसंती मिळत असते. जन-शिवनेरीला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत असून, प्रवाशांना आरामदायी प्रवासाची आणखीन एक बससेवा उपलब्ध झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जन-शिवनेरीच्या संख्येत वाढ करण्यात येईल.

– अरुण सिया, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ (नाशिक)

२३ दिवसांतील आकडेवारी

फेऱ्या – ३६७

किलोमीटर – ७८,०२४

उत्पन्न – ४२,६९,८११

हेही वाचा :

The post नाशिक- पुणे महामार्गावर जन-शिवनेरी सुसाट appeared first on पुढारी.