Site icon

नाशिक-पुणे मार्गावर लवकरच धावणार ‘ई-शिवाई’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी ‘ई-शिवाई’ बसच्या चार्जिंग स्टेशनसाठी नाशिक डेपो एकमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकाच वेळी चार शिवाई बस चार्जिंगसाठी उभ्या राहू शकतात, अशी या स्टेशनची क्षमता असणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक विभागातून पुणे मार्गावर लवकरच शिवाई बस रस्त्यावर धावताना दिसणार आहे. तर पुढील टप्प्यात बोरीवली आणि शिर्डी या मार्गावर शिवाई बस सोडण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेंतर्गत राज्यातील आंतर-शहर वाहतुकीसाठी विद्युत बस अर्थात ‘एसटी महामंडळाकडून पर्यावरणपूरक आणि आरामदायी असलेली ‘ई-शिवाई’ बस खासगीकरणाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरविल्या जाणार आहेत. एसटीच्या ताफ्यात येणार्‍या १५० पैकी २५ ते ३० ई-शिवाई बस नाशिक विभागाला मिळणार आहेत. चार्जिंग स्टेशनसाठी नाशिक आगार क्रमांक एकमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. स्टेशनमध्ये डीपी बसविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्याच्या जुन्या निवासस्थानाच्या जागी १५ गुंठे क्षेत्रावर महावितरण ३३ केव्हीचे उपकेंद्र उभारणार आहे. एसटीकडून उपकेंद्राची जागा नाममात्र दराने महावितरणला दिली जाणार आहे. एसटीला शिवाई चार्जिंगसाठी ११ केव्हीची गरज भासणार आहे. तर उर्वरित वीज महावितरण खासगी ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. चार्चिंग स्टेशनची मीटर रूम एसटीकडून बांधण्यात येणार आहे.

डीपी उभारली… सप्लायचे काय?

डेपो एकमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, महावितरणच्या ३३ केव्हीच्या उपकेंद्राला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. चार्जिंग स्टेशनची डीपी उभारण्यात आली आहे. मात्र, सप्लायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक-पुणे मार्गावर लवकरच धावणार 'ई-शिवाई' appeared first on पुढारी.

Exit mobile version