नाशिक : पुष्पोत्सवावर महापालिकेचा “होऊ द्या खर्च’

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेची आर्थिकस्थिती नाजूक असल्याने मनपा प्रशासनाकडून अनेक नागरी कामांना ब्रेक देण्यात आला आहे. त्यातही नगरसेवकांच्या हक्काच्या निधीतील सुमारे २४० कामे बाजूला सारून महापालिका पुष्पोत्सवावर ४२ लाख रुपयांची उधळण करणार आहे. यामुळे अपेक्षित महसूल जमा होत नसताना मनपा प्रशासनाचा मात्र ‘होऊ द्या खर्च’ असा कारभार प्रशासकीय राजवटीत दणक्यात सुरू आहे.

कोरोना महामारीमुळे गेली दोन ते अडीच वर्षे महापालिकेला अपेक्षित महसूल प्राप्त न झाल्याने आर्थिक शिस्तीचे कारण देत मनपा प्रशासनाने नगरसेवक निधी आणि प्रभाग विकास निधीतील अडीचशेहून अधिक कामांना वर्षभरापासून ब्रेक लावला आहे. यामुळे प्रभागातील छोटी छोटी नागरी कामे थांबली आहेत. प्रशासकीय राजवट असल्यामुळे माजी नगरसेवकांना हस्तक्षेप करता येत नाही आणि कामांसाठी कुणी पाठपुरावा केला तर महसुलाचे कारण पुढे केले जाते. परंतु, पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने मात्र जोरदार कंबर कसली आहे. त्यानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागामार्फत सुरू आहे. त्यासाठी ४१ लाख ९० हजार रुपयांच्या प्रशासकीय खर्चास महासभेने मंजुरी देत मार्ग मोकळा करून दिला आहे.

२००८ मध्ये महापालिकेच्या नगर रचना विभागात पुष्पोत्सवाचा कोटेशन घोटाळा उघडकीस आला होता. त्यात तत्कालीन उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील यांचा सहभाग यामुळे पुष्पोत्सवाची परंपरा खंडित झाली. त्यानंतर २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी केली. परंतु, त्या आधीच त्यांची बदली झाली. त्यांच्यानंतर आयुक्तपदी विराजमान झालेले तुकाराम मुंढे यांनी आर्थिक तरतुदीचे कारण पुढे करत पुष्पोत्सवाच्या आयोजनाला ब्रेक लावला होता. मुंढे यांच्या बदलीनंतर राधाकृष्ण गमे यांनी २०१९ मध्ये पुष्पोत्सवाचे आयोजन केले. त्यानंतर कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे पुष्पोत्सवाच्या आयोजनावर निर्बंध होते.

ठेकेदाराची जुळवाजुळव आधीच

पुष्पोत्सवाच्या आयोजनाची तारीख येत्या काही दिवसांत निश्चित केली जाणार आहे. परंतु, त्या आधीच विशिष्ट ठेकेदारांची जुळवाजुळव उद्यान विभागामार्फत सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ४२ लाख रुपयांच्या या उत्सवासाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली तरी ती केवळ औपचारिकता ठरायला नको.

हेही वाचा :

The post नाशिक : पुष्पोत्सवावर महापालिकेचा "होऊ द्या खर्च' appeared first on पुढारी.