नाशिक : पूरपरिस्थिती निवळल्यावर गोदापात्रात ‘मॉकड्रिल’, यंत्रणांचे ‘वराती मागून घोडे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, नाशिक महापालिका व पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 21) गोदाघाटावरील गौरी पटांगण येथे मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी गोदापात्रात बुडणार्‍या युवकाचे प्राण वाचविताना यंत्रणांना गर्दी जमविण्यात यशही आले. मात्र, गोदावरीची पूरपरिस्थिती निवळल्यानंतर यंत्रणांना मॉकड्रिलची कल्पना सुचणे म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असेच म्हणावे लागेल.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात दुपारी 12 च्या सुमारास फोन खणखणला. कक्षातील अधिकार्‍यांनी फोन उचलल्यानंतर पलीकडील व्यक्तीने गोदाघाटावरील गौरी पटांगण येथे नदीपात्रात एक युवक बुडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचार्‍यांसह मनपाचे अग्निशमन दल, पोलिस व अन्य संबंधित यंत्रणा गोदाघाटावर दाखल झाल्या. यावेळी यंत्रणांनी रेस्क्यू ऑपरेशन करीत बुडणार्‍या युवकाचे प्राण वाचविले आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. सरतेशेवटी हे मॉकड्रिल असल्याचे यंत्रणांकडून जाहीर केले.

वास्तविक पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यातच मागील 12 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूरदेखील येऊन गेला. पण, हा पूर ओसरल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या यंत्रणांनी मॉकड्रिल घेतले. परंतु, या रंगीत तालीमवेळी यंत्रणांमधील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील काही अनफिट स्वयंसेवक मॉकड्रिलमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यंत्रणांचा मॉकड्रिलचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स ठरला आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका
शहरातील पुलांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्तांनी आदेश काढले. या आदेशात पुलांवर गर्दी व वाहने पार्किंगला बंदी घालण्यात आली. परंतु, गुरुवारच्या (दि.21) मॉकड्रिलवेळी नागरिकांनी संत गाडगे महाराज पुलावरच गर्दी केली. यावेळी नागरिकांनी पुलावरच वाहने पार्क केली. विशेष म्हणजे उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पुलावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.

हेही वाचा :

The post नाशिक : पूरपरिस्थिती निवळल्यावर गोदापात्रात 'मॉकड्रिल', यंत्रणांचे ‘वराती मागून घोडे’ appeared first on पुढारी.