नाशिक : पैसे घेऊन आणखी एक कंपनी छुमंतर; गुंतवणूकदारांना सव्वा कोटीचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून कलकाम नावाच्या कंपनीने गाशा गुंडाळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याने मुंबई नाका पोलिस ठाण्यात कंपनीच्या चेअरमन, संचालक व एजंट विरोधात फसवणूक, अपहारासह महाराष्ट्र ठेवीदार हितसरंक्षण कायदा १९९९ नुसार फिर्याद दाखल केली आहे.

मुंबई नाका पोलिस ठाण्यात कलकाम रियल इन्फ्रा (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या संचालक, एजंट आदींविरोधात एक कोटी १७ लाख २९ हजार ५५३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. योगिता घनश्याम बैरागी (रा. हिरावाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी कंपनीत २०१३ मध्ये मार्केटिंग एरिया ऑफिसर म्हणून काम सुरू केले होते. कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबईतील वाशी येथील तर शहरातील मुंबई नाका येथील माधव प्लाझा येथे दुसऱ्या मजल्यावर होते. जिल्ह्यात गुंतवणूकदारांची साखळी निर्माण करून कंपनीत आर्थिक गुंतवणूक करण्याची जबाबदारी योगिता यांच्यासह इतरांवर कंपनीचे चेअरमन विष्णू पांडुरंग दलत्ती, संचालक अशोक बागूल, विजय सुपेकर, सुनील वांद्रे, तुषार सोनार, देवानंद शर्मा, संतोष थोराटे, संदेश पडियार यांनी सोपवली होती. त्यानुसार कंपनीच्या ६८ सिनीअर सेल्स रिप्रेझेन्टेटिव्ह व २३८ सेल्स रिप्रेझेन्टेटिव्ह मार्फत ३४२ गुंतवणूकदारांनी एक कोटी १७ लाख २९ हजार ५५३ रुपयांची गुंतवणूक केली. हे पैसे कंपनीच्या बँक खात्यात जमा झाले. गुंतवणुकीवर कंपनीस गुंतवणूकदारांना दोन कोटी पाच लाख ५८ हजार ८४५ रुपये द्यावे लागणार होते. मात्र, २०१९ पासून कंपनीने गुंतवणूकदारांना परतावा देण्यास नकार दिला. कंपनीने शहरातील कार्यालय बंद केल्याचेही समोर आले. कंपनीचे संचालक फोन उचलत नसल्याने गुंतवणूकदार हताश झाले. याेगिता बैरागी यांनी स्वत: या कंपनीत २९ लाख ७८ हजार ६५९ रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूकदारांनी योगिता यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाणे गाठून कंपनीच्या चेअरमन, संचालक, एजंटविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

अशी होती आर्थिक परताव्याची योजना : या कंपनीच्या रिकरिंग डिपॉझिट व फिक्स डिपॉझिट योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा जाहीर केला होता. त्यात फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवल्यास ३९ महिन्यांत दीडपट व ६५ महिन्यांत दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. तर रिकरिंगमध्ये गुंतवणूक केल्यास तीन ते पाच वर्षांत २५ टक्केपर्यंत परतावा जाहीर केला होता.

फसवणुकीचा ट्रेंड सारखाच : कमी कालावधीत दामदुप्पटपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक भामट्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. केबीसी कंपनी, विकल्प ट्रेड सोल्युशन, गॅम्बलर एंटरप्रायजेस, गोल्डसुख ट्रेड इंडिया, टायकून इन्स्पायर इंटरनॅशनल प्रा. लि., इंडियन इमू प्रा. लि. कंपनी, गणराज सेल्स प्रा. लि, स्टार कन्सलटिंग सर्व्हिसेस, इन्व्हेस्टमेंट मनी सर्व्हिसेस कंपनी, व्ही. एम. फायनान्स, ऑरम रियालिटी कंपनी आदी कंपन्यांच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना अब्जावधी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. फसवणुकीचा ट्रेंड जवळपास सारखाच असतानाही गुंतवणूकदार जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पैसे घेऊन आणखी एक कंपनी छुमंतर; गुंतवणूकदारांना सव्वा कोटीचा गंडा appeared first on पुढारी.