नाशिक : पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने आठ तोळ्याचे दागिने लंपास

दागिने चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो व सोन्याचे दागिने चकाचक करून देतो. असे सांगून दोन संशयित अज्ञात भामट्यांनी महिलेचे तब्बल दोन लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार भरदिवसा घडला आहे. याप्रकरणी दोन संशयित अज्ञातांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शितल अनिल छत्रिय (रा. हनुमंतानगर, लोखंडे मळा, जुना सायखेडारोड, जेलरोड, नाशिक रोड) ही महिला घरी असताना दोन अज्ञात संशयित आले. आम्ही सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून चकाचक करून देतो असे सांगून क्षत्रिय यांचा विश्वास संपादन केला. अज्ञांतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शितल छत्रिय यांनी घरातील आठ तोळे वजनाचे व सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्या दोन संशयताकडे दिले. त्यानंतर दोन संशयित भामट्यांनी क्षत्रिय यांची नजर चुकवून दागिने लंपास केले. त्यानंतर लगेचच तिथून फरार झाले. दरम्यान, घटनेनंतर महिलेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने ही घटना घरच्यांना व आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तातडीने चोरट्यांचा शोध घेण्यात आला. परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शितल छत्रिय यांनी उपनगर पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बटुळे हे पुढील तपास  करत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने आठ तोळ्याचे दागिने लंपास appeared first on पुढारी.