नाशिक : पोलिसपाटलावरील हल्ल्या प्रकरणी सात संशयित जेरबंद

दिंडोरी,www.pudhari.news

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील निळवंडी येथील पोलिसपाटील अंबादास शंकर पाटील यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाच्या गुन्ह्याचा दिंडोरी पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वी तपास करीत गुन्हा उघडकीस आणला आणि सात संशयितांना अटक केली.

निळवंडी येथील पोलिसपाटील अंबादास पाटील हे 18 ऑगस्टला गुरे चारत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने जबरी हल्ला करत त्यांना जखमी केले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित गोरक्षनाथ शेखरे, अविनाश ढिकले, सागर भवर, सागर धुळे, संदीप केंग व भावेश भवर व मुख्य सूत्रधार रोशन पाटील यांना ताब्यात घेतले. निळवंडी गावातील रोशन पाटील यांच्याकडे सागर धुळे हा मजुरीस आलेला होता. रोशन पाटील यांनी अंबादास पाटील यांच्याबरोबरच्या शेतजमीन वाटप व इतर कौटुंबिक वादाला कंटाळून पोलिसपाटलाचा काटा काढण्यासाठी सागर धुळेला गळ घातली होती. सागर धुळे यांनी आपल्या मित्रांच्या साथीने कट रचत अंबादास पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल नाशिकचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिंडोरीचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लहारे, पोलिस हवालदार संदीप नवले, संदीप कडाळे, बाळासाहेब पानसरे, बाळासाहेब कावळे, सुमित आवारी, अमोल साळवे, हेमंत पवार, मधुकर बेंडकुळे, अविनाश आहेर यांच्या पथकाला 10 हजार रुपये बक्षीस देऊन गौरव केला.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिसपाटलावरील हल्ल्या प्रकरणी सात संशयित जेरबंद appeared first on पुढारी.