पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सर्वत्र भाऊबीजेचा सण साजरा होत असताना गुन्ह्याच्या तपासाकामी गोदाघाटावर आणण्यात आलेल्या दोघा आरोपींनी गौरी पटांगण येथून पोलिसांची नजर चुकवून व हातातील बेडी तोडून पलायन केल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा पोलिसांच्या (Nashik Police) कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राहुल कांतराज पवार (१९, रा. डोमगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) व योगेश नथीलाल काळे (२८, रा. कुंबरगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी पसार झालेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांना पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक झाली होती. तर या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. बुधवारी (दि.१५) दाखल गुन्ह्याच्या तपासाकामी हातात बेड्या ठोकलेल्या या दोघांना पंचवटी पोलिसांनी (Nashik Police) पोलिस वाहनातून गोदाघाटावरील गौरी पटांगणावर आणले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची नजर चुकवून आणि शिताफीने हातातील बेडीमधून अलगद हात काढून घेत दोघाही आरोपींनी पोलिस वाहनातून पळ काढला. विशेष म्हणजे हा प्रकार काही वेळाने पथकाच्या लक्षात आला अन् त्यांची एकच धांदल उडाली. परिसरात कसून शोध घेऊन ही फरार आरोपी हाती लागले नाहीत. सर्व प्रयत्न व्यर्थ ठरल्यानंतर अखेर गुरुवारी (दि.१६) पोलिस शिपाई राहुल गोतपगार यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. एल. काकड हे करीत आहे.
हेही वाचा :
- मराठा-धनगर आरक्षणासंदर्भात ठाकरे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार
- Aditya Thackeray : अपुर्ण पुलाचे उद्घाटन करणे आदित्य ठाकरेंना भोवले; गुन्हा दाखल
- मध्य प्रदेशात 71 टक्के मतदान
The post नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले appeared first on पुढारी.