नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील परिमंडळ दोनमधील गंभीर गुन्हे आणि गुन्हेगार वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांकडून ओरड होत आहे. त्यामुळे पोलिसांवर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा दबाव असून, पोलिस आयुक्तांनी प्रशासकीय कारण सांगत पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांची मुख्यालयात बदली केली आहे. तर उपआयुक्तपदी मोनिका राऊत आणि सहायक पोलिस आयुक्तपदी आनंदा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील अंबड, नाशिकरोड, उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत वाहनांची तोडफोड, जाळपोळ, हाणामारी, घरफोडी, एटीएम केंद्रात चोरी असे गंभीर गुन्हे घडले. गुन्हेगारी वाढल्याची ओरड सुरू झाली होती. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकरोड पोलिस ठाण्यातील १२ पोलिसांसह गुन्हे शाखेतील दोन व अंबडमधील एका पोलिसाची दंगल नियंत्रण पथकात बदली केली. त्यातच सोमवारी (दि.२४) मध्यरात्री विहितगावाला दोघांनी वाहनांची जाळपोळ, तोडफोड केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच पालकमंत्री दादा भुसे यांनीही नाराजी वर्तवत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त शिंदे यांनी परिमंडळ दोनचे उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांची पोलिस मुख्यालयात बदली केली. तर मुख्यालयातील मोनिका राऊत यांची परिमंडळ दोनला बदली केली आहे. तसेच सहायक पोलिस आयुक्त भुसारे यांची विशेष शाखेत बदली केली असून, विशेष शाखेतील आनंदा वाघ यांची नाशिकरोड विभागात aबदली केली आहे. बदलीचे प्रशासकीय कारण सांगितले जात असले तरी गुन्हेगारीवर अंकुश नसल्याने या बदल्या झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.
हेही वाचा :
- पाण्यातील शंभर फूट खोल गुहेत गेला आणि…
- कोल्हापूर : पूरप्रवण भागात स्थलांतराच्या नोटिसा
- पुणे रेल्वे स्थानकावर ’रेस्टॉरंट ऑन व्हील’
The post नाशिक : पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्तांची उचलबांगडी appeared first on पुढारी.