Site icon

नाशिक : पोलिस करताय गुन्हेगारांच्या कुंडलीची मांडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यावर शहर पोलिसांचा भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता गुन्हेगारांच्या माहितीचे संकलन केले जात आहे. या माहितीत गुन्हेगारांच्या गुन्ह्यांसह त्यांची कौटुंबिक, मित्रपरिवार, गुन्ह्यांची पद्धत, त्यांच्याकडील मालमत्ता यांचा समावेश आहे. यासाठी शहरातील तेरा पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत ही माहिती संकलित केली जात आहे.

सराईत गुन्हेगारांसह अल्पवयीन व टवाळखोरांकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न, खून यासह चोरी, घरफाेडी, जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे करीत आहेत. या गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड केली असली तरी गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांवर पोलिसांनी तडीपार, स्थानबद्धतेच्या कारवाई केल्या आहेत. या कारवाइमुळे इतर गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांना सूचना करीत पोलिस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील प्रत्येक गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. या गुन्हेगारांची कुंडली जमा केली जात असून, त्यात त्यांचे सध्याचे उपजीविकेचे साधन, कौटुंबिक परिस्थिती, मित्रपरिवार, मालमत्ता, नियमित हालचालींबाबतही माहिती संकलित केली जात आहे. भविष्यात एखाद्या गुन्ह्यात संबंधित गुन्हेगाराचा सहभाग आढळून आल्यास त्यास तातडीने पकडता येईल किंवा त्याच्याविरोधात पुरावे गोळा करणे, तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक स्वरूपात कारवाई प्रस्तावित करणे पोलिस आयुक्तालयाला सोयीस्कर होणार आहे.

यांची माहिती होतेय संकलित

जानेवारी २०१३ पासून आतापर्यंत दोन किंवा दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची विस्तृत माहिती संकलित केली जात आहे, तर किरकोळ गुन्हेगारांची केवळ यादी तयार करून कारवाई सुरू आहे. दहा वर्षांमध्ये सराईत गुन्हे करणाऱ्यांची माहिती तयार करून त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येईल. गुन्हेगारांना समज देण्यात येत असून, कोणत्याही स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य केल्यास कठोर कारवाईची तंबी दिली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिस करताय गुन्हेगारांच्या कुंडलीची मांडणी appeared first on पुढारी.

Exit mobile version