
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या १० वरून वाढवून १५ करावी. तसेच या कॅमेऱ्यांमधील डेटा एक वर्षाऐवजी दीड वर्ष मिळेल, अशा पद्धतीने त्याची रचना करावी, असे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यंत्रणांना दिले आहेत.
विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हास्तरीय सीसीटीव्ही निगराणी पर्यवेक्षण समितीची शुक्रवारी (दि.३) बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप उपस्थित होते. शहर व ग्रामीण भागांमधील पोलिस स्टेशन्समध्ये तक्रारदारांचा नेहमीच वावर असतो. पण, पोलिस स्थानकामध्ये म्हणणे एेकून घेतल्या जात नसल्याच्या तक्रारी येतात. तसेच काहीवेळा पोलिस स्थानकामध्ये अन्य कामे घेऊन येणारे नागरिक अथवा तक्रारदार यांच्याबाबत मानवी हक्कांचे उल्लंघनही होत असल्याचा अनुभव येताे. या सर्व पार्श्वभूमीवर गमे यांनी सविस्तर आढावा घेतला.
पोलिस स्थानकाच्या आवारात घडणाऱ्या सर्व घटनांचे रेकॉर्डिंग किमान दीड वर्षापर्यंत जतन करण्याच्या सूचना गमे यांनी केल्या. तसेच पोलिस ठाणे आणि तेथील आवारातील प्रत्येक कोपरा सीसीटीव्हीच्या निगराणीत असावा याकरिता कॅमेऱ्यांची संख्या १० वरून वाढवून १५ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे पोलीस ठाण्यामधील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होणार आहे. एखाद्या प्रकरणात पोलिसांचा दोष असल्यास अथवा समाजघटकांकडून जाणीवपूर्वक पोलिसांवर चुकीचे आरोप केले जात असल्यास ते पुढे येण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा :
- नगर : डीजेचा दणदणाट अन् लेझर शो…! राशीनमध्ये शिवजयंती मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे
- पुणे : भाजपच्या माजी नगरसेवकांची अकार्यक्षमता भोवली?
- पुणे : जिल्हा वार्षिक योजना आता हजार कोटींची; 130 कोटींची वाढ
The post नाशिक : पोलिस ठाण्यांच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढणार appeared first on पुढारी.