Site icon

नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी अंदाजे महिनाभर प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. पुणे येथील मैदानी चाचणी फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थगित झाली. तसेच शासनाच्या आदेशानुसार राज्यातील लेखी परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने लेखी परीक्षेसाठी नाशिक ग्रामीणच्या उमेदवारांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नाशिक ग्रामीणच्या 164 रिक्त शिपाईपदांसाठी 2 ते 20 जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली. या मैदानी चाचण्यांचे निकाल प्रसिद्ध झाल्यावर उमेदवारांचे सामाजिक, समांतर आरक्षण व त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद पोलिसांनी केली. हरकतींवरही निर्णय घेऊन ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार मैदानी चाचणीत ज्या उमेदवारांनी किमान 50 टक्के गुण मिळवले आहेत, या उमेदवारांमधून एका रिक्तपदासाठी 10 उमेदवार, यानुसार लेखी परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. मैदानी चाचणीत साडेचार हजार उमेदवारांनी 25 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यापैकी 1, 861 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे. राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र आता बृहन्मुंबई, पुणेसह इतर ठिकाणची मैदानी चाचणी सुरू आहे. मात्र, निवडणुकांमुळे पुण्यात मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे व बृहन्मुंबईतील मैदानी चाचणीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच लेखीचा निर्णय होईल. ही प्रक्रिया महिनाभर लांबण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर appeared first on पुढारी.

Exit mobile version