नाशिक : पोलिस भरतीसाठी उमेदवार मध्यरात्रीपासून मैदानावर तळ ठोकून

police

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यासह राज्यभरातून शेकडो उमेदवार कडाक्याच्या थंडीतही मध्यरात्रीपासून पोलिस भरतीसाठी आडगाव येथील मैदानावर तळ ठोकून होते. नाशिक ग्रामीणच्या चालकपदाची मैदानी चाचणी सोमवारी (दि. २) पहाटे 6 पासून सुरू झाली. सीसीटीव्हीच्या निरीक्षणात ही प्रक्रिया पार पडत आहे.

तीन वर्षांपासून रखडलेली भरतीप्रक्रिया आता सुरू झाली असून, या भरतीसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नाशिक ग्रामीणच्या चालकपदाच्या भरतीसाठी अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव, नंदुरबार, साक्री, चाळीसगाव, भुसावळ, शिंदखेडासह इतर ठिकाणांहून शेकडो उमेदवार मैदानात दाखल झाले होते. पहाटे 6 च्या चाचणीसाठी मध्यरात्रीपासून उमेदवारांनी मैदानालगत गर्दी केली होती. नाशिक ग्रामीण पोलिस दलात १७९ रिक्त पदांसाठी २१ हजार ४९ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी तीन अर्ज तृतीयपंथी उमेदवारांचे आहेत. त्यानुसार एका रिक्त जागेमागे ११७ उमेदवार भरतीच्या रिंगणात असून, त्यामध्ये पदवीधरांसह पदव्युत्तर उमेदवारही अधिक आहेत. या उमेदवारांची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून सुरू झाली असून, लेखी परीक्षेसाठी सुमारे पाच हजार उमेदवार पात्र ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी होत आहे. ४ जानेवारीपर्यंत चालकपदाच्या उमेदवारांची चाचणी होणार असून, त्यानंतर शिपाई पदासाठी मैदानी चाचणी घेतली जाईल. चालकपदांच्या १५ जागांसाठी २ हजार १०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार सोमवारी १ हजार उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ६०० उमेदवारांनी चाचणीस हजेरी लावली. दरम्यान, उमेदवारांनी केलेल्या दमदार सरावाचा परिणाम चाचणीदरम्यान स्पष्ट दिसत असून, वर्दीच्या स्वप्नपूर्तीच्या परीक्षेत उमेदवार स्वत:ला सिद्ध करीत आहेत.

आजची चाचणी (दि. ३)

चालकपद : १,११४ उमेदवार (पुरुष ९६५ आणि ७१ महिला)

कागदपत्रे तपासूनच प्रवेश

पोलिसांनी उमेदवारांचे ओळखपत्र व कागदपत्रे तपासून त्यांना मैदानात प्रवेश दिला. प्रत्येकाला क्रमांक देण्यात आला. त्या क्रमांकानुसारच त्याला पुकारण्यात आले. यावेळी उमेदवाराचे नाव पुकारणे पोलिसांनी कटाक्षाने टाळले. दरम्यान, काही उमेदवारांना पोहोचण्यास विलंब झाला. त्यांना पहाटे 6 नंतर प्रवेश नव्हता. परंतु, अधीक्षकांच्या आदेशावरून उमेदवारांना 7 पर्यंत प्रवेश देण्यात आला.

धावण्यात उमेदवारांची कसोटी

चालकपदाच्या उमेदवारांची १०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जात नाही. मात्र, १६०० मीटर चाचणीसाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानाचा वापर करण्यात आला. यावेळी ७ मिनिटांपैकी गुणवत्ता यादीसाठी ५.१० मिनिटांत अंतर पूर्ण करण्यासाठी उमेदवारांची कसोटी पाहायला मिळाली. अनेकांची दमछाक स्पष्ट दिसली, तर सर्व चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यातून स्पष्ट जाणवत होते.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिस भरतीसाठी उमेदवार मध्यरात्रीपासून मैदानावर तळ ठोकून appeared first on पुढारी.