नाशिक : प्रकाश म्हस्के व त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी जैन समाजाचे पोलिसांना निवेदन

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथील मेडिकल दुकानदार दिनेश चोपडा यांना दारुच्या नशेत मारहाण करून दहशत निर्माण केल्या प्रकरणी नाशिक शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, त्यांचा मुलगा आकाश म्हस्के आणि साथीदारांवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी येथील जैन स्थानकवासी श्रावक संघाने केली आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्याला याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देताना जैन कॉन्फरन्सचे युवा अध्यक्ष (दिल्ली) पिंटू कर्नावट, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी, नाशिक रोड संघपती राजेंद्र मंडलेचा, जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष मोहनशेठ चोपडा, चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुभाष घिया, जैन कॉन्फरन्सचे अविनाश चोरडिया, मनीष शाह (बी.जे.एस अध्यक्ष), रुपेश चोपडा, ललित सुराणा आदी उपस्थित होते.

पोलिसांना दिलेल्या या निवेदनात, चोपडा यांच्या दुकानासमोर शिवभोजन हॉटेल आहे. चोपडा यांच्या दुकानासमोर कोणीतरी गाडी पार्क केली. हॉटेलचे संचालक प्रकाश म्हस्के, आकाश म्हस्के यांनी गाडी कोणी लावली अशी विचारणा चोपडा यांना केली. चोपडा यांनी काही माहिती नसल्याचे सांगताच दारुच्या नशेतील प्रकाश म्हस्के, आकाश म्हस्के व साथीदारांनी दुकानात घुसून चोपडा यांना बेदम मारहाण केली. प्रकाश म्हस्के यांनी हत्याराने चोपडांवर वार केले. रक्तबंबाळ झालेले चोपडा खाली पडल्यांवर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काऊंटरची काच फोडली. शेजारील दुकानदार कुमट यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता प्रकाश म्हस्के, आकाश म्हस्के व साथीदारांनी त्यांनाही मारहाण केली. त्यांच्या दुकानात जाऊन तेथेही नुकसान केले. चोपडा व कुमट यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकाश म्हस्के व साथीदारांचे कृत्य दहशत निर्माण करणारे असून यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करणे अशक्य होणार आहे. व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हल्लेखोरांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.  झुंडशाही रोखावी, वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी लक्ष घालावे. दरम्यान, या हॉटेल समोर नेहमीच गाड्या वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने लावल्या जातात. महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांनी निवेदनातून केली आहे.

हेही वाचा  :

The post नाशिक : प्रकाश म्हस्के व त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी जैन समाजाचे पोलिसांना निवेदन appeared first on पुढारी.