नाशिक : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील १८७ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. १६) मतदान होणार आहे. निवडणुकीत शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान, मतदानासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, ६०७ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. जनतेमधून थेट सरपंचांची निवड होणार असल्याने सर्वत्र चुरस वाढली आहे.

पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील एकूण १९४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. अर्ज माघारीनंतर ७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोेध झाल्यानंतर उर्वरित १८७ ठिकाणी मतदान घेण्यात येणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून या सर्व ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. शुक्रवारी (दि. १४) प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला जात आहे. निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, रविवारी (दि. १६) होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनानी तयारी पूर्ण झाली आहे. चारही तालुक्यांत ६०७ मतदान केंद्रे निश्चित करताना, तेवढेच ईव्हीएम तालुक्यांना वितरीत केले आहेत. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी एका केंद्रावर सहा याप्रमाणे एकूण ३ हजार ६४२ कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रशासनाने केली. प्रत्येक केंद्रात केंद्राध्यक्ष, ३ मतदान केंद्र अधिकारी, प्रत्येकी एक शिपाई व पोलिस असा स्टाफ नेमण्यात येणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना यापूर्वी दोनदा निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले. शनिवारी (दि. १५) मतदान केंद्रात रवाना होण्यापूर्वी तिसरे व अंतिम प्रशिक्षण दिले जाईल. दरम्यान, या सर्व राजकीय लढाईत मतदाराने कोेणाच्या पारड्यात आपला काैल टाकला, हे सोमवारी (दि. १७) निकालानंतर स्पष्ट होईल.

या ग्रामपंचायती बिनविरोध :

चारपैकी तीन तालुक्यांतील ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये त्र्यंबकेश्वरमधील जातेगाव खुर्द, पिंपळद, त्र्यंबक व सारस्तेचा समावेश आहे. तर पेठमधील नाचलोंढी व अंधुरूट तसेच सुरगाण्यातील मोहपाडा व अलंगुण या ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या.

निवडणूक दृष्टिक्षेपात

तालुका           ग्रामपंचायती              मतदान केंद्रे

पेठ                  69                         211

सुरगाणा           59                         208

त्र्यंबकेश्वर         54                         103

इगतपुरी          05                        15

हेही वाचा:

The post नाशिक : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार appeared first on पुढारी.