Site icon

नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके
वेळ : पहाटे पाचची, ठिकाण -औरंगाबाद रोडवरील मिरची चौक, पेटलेल्या बसमधून उठणारे आगीचे लोळ, येणारे किंचाळण्याचे आवाज… जळणार्‍या माणसांना वाचवताना नि:शब्द झालेली मने… भीषण अपघातातील मन हेलावून टाकणार्‍या या घटनेचे ‘आँखों देखा हाल’ सांगताना प्रत्यक्षदर्शींच्या आणि ऐकणार्‍यांच्याही अंगावर शहारे उभे राहिले.

पहाटे नेटकाच उठलो होतो. तितक्यात अचानक मोठा आवाज झाला. तो ऐकून माझ्यासह घरातील उठलेली सर्व मंडळी घराबाहेर आली. बघतो तर काय, समोरच बस पेटलेली होती आणि दुसरा डंपर रस्त्याच्या कडेला जाऊन विजेच्या खांबाला आदळला होता. आजूबाजूला बघितले, तर रस्त्यावर सर्व ठिकाणी डिझेल सांडलेले होते. बसच्या आतमधून लोक मोठमोठ्याने किंचाळत, मदतीची याचना करत, ओरडत होते, रडत होते. काही लोक बसच्या मागील खिडकीतून खाली उड्या मारत होते. हे सर्व बघून मन हेलावून गेले. लगेच घटनास्थळी धाव घेतली. बसची आग मोठ्या प्रमाणात वाढली होती. बसमध्ये जाणे अवघड होते. बसचे दरवाजे आणि खिडक्या उघडत नव्हत्या. लागलीच आणखी काही लोक जमा झाले. पटकन घराजवळ जाऊन हातात मिळेल ते, टिकाव, फावडे असे साहित्य घेऊन बसचे दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या, जसे जमेल तसे एकेकाला बाहेर काढले. प्रसंग अतिशय कठीण होता, काय करावे काही सुचत नव्हते. त्वरित पोलिसांना व अग्निशामक दलाला संपर्क केला. काही वेळात पोलिस व्हॅन आणि अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांच्या मदतीने उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. मात्र, मृतांना आणि जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पोलिसांच्या मोठ्या गाडीत लोकांना घेऊन बस जिल्हा शासकीय रुग्णालयकडे रवाना केली, तरीही काही लोक अजून शिल्लक होते. सिग्नलवर जाऊन जाणार्‍या सिटीलिंकच्या बसला आम्ही सगळ्यांनी थांबवले व त्वरित बस घटनास्थळी नेत मृतदेह व उर्वरित जखमींना त्या बसमध्ये बसवून ती शासकीय रुग्णालयाकडे रवाना केली. अर्धवट जळालेले मृतदेह पाहून काळजाचा ठोका चुकला, अशी प्रतिक्रिया घटनास्थळालगत राहणार्‍या नीलेश सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’ appeared first on पुढारी.

Exit mobile version