नाशिक : प्रत्येक क्षय रुग्णाला सहा महिने पोषण आहार

क्षयरुग्ण पोषण आहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

येथील रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोगमुक्त भारत अभियानास सहाय्य म्हणून पुढील ६ महिने बारा क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि.२०) संबंधित बारा रुग्णांना आहार वाटपाचा शुभारंभ झाला.

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानअंतर्गत ‘निक्षय मित्र’ रोटरी क्लब, नाशिक वेस्ट यांच्याकडून १२ क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्या संस्था तसेच व्यक्तीांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. नाशिक महापालिकेच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिजामाता रुग्णालय, मेनरोड येथे क्षयरोगाचे उपचार घेत असलेल्या १२ क्षयरुग्णांना शुक्रवारी (दि.२०) पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. उपचार घेत असलेल्या सर्व क्षयरुग्णांसाठी उपचारासोबत पोषण आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रुग्ण लवकर बरा होतो, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी केले. निक्षय मित्र रोटरी क्लब यांचे आभार व्यक्त करून यापुढेदेखील अधिकाधिक क्षयरुणांना पोषण आहार द्यावा, असे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमअंतर्गत विभागातील समन्वयक भगवान भगत यांनी प्रास्ताविक केले. रोटरी क्लब नाशिक वेस्टच्या अध्यक्षा सोनल शहा, दीपा चांगरणी, जयंत स्थळेकर, ऊर्मिला हिरसकर यांच्या हस्ते क्षयरुणांना पोषण आहार बास्केटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिजामाता रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप, डॉ. स्वाती सावंत, पर्यवेक्षक संदीप गवळी, अभय नाकिल, आशिष वराडे उपस्थित होते. समाजातील रोटरी क्लब सारख्या सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी पुढे यावे. सामाजिक बांधिलकी जपत क्षयरुग्णांचे ‘निक्षय मित्र’ व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या शहर क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विभागाने केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : प्रत्येक क्षय रुग्णाला सहा महिने पोषण आहार appeared first on पुढारी.