Site icon

नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
नदीपात्रालगत असलेल्या कचरा डेपोमधील कचरा रात्री जाळण्याच्या दररोजच्या प्रयोगामुळे धुराचे लोट गावभर पसरून हजारो ओझरकरांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषित हवेमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार अनिल कदम व माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम या दोघांचीही निवासस्थाने कचरा डेपोपासून हाकेच्या अंतरावर असताना याबाबत कोणीच काही बोलत नाही.

ओझरला बाणगंगा नदीकिनारी जुन्या सायखेडा रस्त्याला लागून कचरा डेपो आहे. गावातील तसेच उपनगरातील सर्व कचरा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो. दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा रात्री जाळला जात असल्याने हा डेपो नागरिकांच्या जीवावर उठला आहे. कचरा डेपोला लागूनच वसाहती आहेत, तर नदी पलीकडे शेती व शेलार, शिंदे, कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या सहाय्याने डंपिंग करत असताना त्याची प्रचंड दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागली होती. सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने धुराचे लोट उठत असल्याने घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. गावात तर सकाळ-सायंकाळ धुराचा कुबट वास दरवळत असतो. सायंकाळनंतर धुरामुळे परिसर अंधारला जातो. लहान बालकांपासून तर आबालवृद्धांपर्यंत अनेकांना दम्याचा त्रास सुरू झाला आहे. सदर डम्पिंग ग्राउंड त्वरित हलविण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. ऑरगॅनिक वेस्ट ट्रीटमेंट ठरलाय ‘वेस्ट’ एचएएलने त्यांच्या सीएसआर फंडातून बांधून दिलेला व दररोज पाच टन क्षमता असलेल्या ऑरगॅनिक वेस्ट ट्रीटमेंट प्रकल्प हस्तांतरित होऊन वर्ष लोटले. परंतु तो कार्यान्वित होऊ शकलेला नाही. हा प्रकल्प सुरू झाल्यास कचरा जाळण्याचा शॉर्टकट मार्ग बंद होऊन नगर परिषदेला उत्पन्न सुरू होईल.

या वसाहतींना धोका
कचरा डेपोला लागून अनसूया पार्क, सरकारवाडा, ओम गुरुदेव चाळ, तानाजी चौक, चांदणी चौक, शिवाजी रोड, मारुती वेस, सायखेडा फाटा, राजवाडा, राणाप्रताप चौक, कोळीवाडा, कदम वस्ती, शिंदे मळा आहे. येथे तर सायंकाळी बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दूषित हवेमुळे खोकल्याचा त्रास होत असून, भविष्यात अनेकांना गंभीर आजारांना निमंत्रण देईल हे निश्चित आहे. कचरा डेपोलगतच सार्वजनिक शौचालय असून, त्याची स्वच्छताच होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर, तर कधी कचरा डेपोत जात असल्याने डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत आहे.

The post नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा appeared first on पुढारी.

Exit mobile version