नाशिक : प्रवाशी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे दागिने लंपास

पोत ओरबडली ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिवाळीच्या सुट्टी संपल्यानंतर अनेक नागरिक घराकडे परतत आहे. त्यामुळे अजूनही बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. त्याचाच फायदा घेत चोरटेही सक्रीय झाले असून त्यांनी महामार्ग बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१) उघड झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात राज्यातील नवसारी येथील रहिवासी सुरेखा अशोक टकले या मंगळवारी (दि.१) दुपारी बाराच्या सुमारास महामार्ग बसस्थानकात गेल्या होत्या. दिंडोरी येथे जाण्यासाठी त्या बसमध्ये बसलेल्या असताना त्यांच्याकडील ८० हजार रुपयांची तीन तोळे वजनाची सोन्याची पोत चोरट्याने चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर सुरेखा यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली असून चोरट्याने बसमध्ये चढताना किंवा प्रवासादरम्यान पोत चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

याआधीही गेल्या काही दिवसांत प्रवाशांकडील पाकिट, सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसला आहे. चोरटे गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडील किंमती ऐवज चोरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी मुंबईनाका पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांचे पथक महामार्ग बसस्थानकात तैनात केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : प्रवाशी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.