नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका

निमा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज विभाग, कामगार उपायुक्तालय, एमआयडीसी, महापालिका तसेच पोलिस प्रशासन या सर्वच विभागांशी निगडित उद्योजकांचे अनेक प्रश्न असून, वारंवार पाठपुरावा करूनदेखील ते सोडविले जात नाही. उलट उद्योजकांनाच नोटिसा बजावल्या जातात. हीच जर परिस्थिती कायम राहिल्यास आम्ही सर्व उद्योग बंद करतो, अशी संतप्त भूमिका उद्योजकांनी मांडली. यावेळी उद्योजकांनी उपस्थित अधिकार्‍यांसमोर तक्रारींचा पाढा वाचत, ते लवकराच लवकर सोडविल्या जाव्यात, अशी मागणी केली.

पालकमंत्री दादा भुसे सर्व यंत्रणांच्या पदाधिकार्‍यांसमवेत उद्योजकांची बैठक निमात आयोजित केली होती. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कामगार उपआयुक्त विकास माळी, अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेंद्र राजपूत, विद्युत मंडळाचे माणिकलाल तपासे, मानद सचिव राजेंद्र अहिरे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी उद्योजकांनी वसाहतीतील रस्ते, गुन्हेगारी, प्रशासकीय परवानग्यांची पूर्तता, वाहतूक कोंडी, अस्वच्छता, कामगार युनियनचा जाच, मालमत्ता कर, अंबड औद्योगिक वसाहतीत पोलिस ठाणे, अतिक्रमण घंटागाड्यांचे नियोजन, कंपन्यांना पॉवर सप्लाय, दिंडोरीसह, सिन्नर व इतरत्र नव्या वसाहतीतील सुविधा, उद्योगांसाठी भूखंड आदी प्रश्न मांडले. त्यावर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, उद्योगांचा मालमत्ता कर या विषयावर प्राधान्याने विचार सुरू आहे. लवकरच इंडस्ट्रिअल स्लॅब आणणार आहे. त्याव्यतिरिक्त उद्योगांना फायरसेस, सीईटीपी, प्रॉपर्टी टॅक्स, स्वतंत्र घंटागाड्या, स्ट्रीट लाइट या सुविधा दिल्या आहेत. सुसज्ज रस्ते आणि वसाहतीतील अस्वच्छता यावरदेखील काम केले जाणार आहे. एखादा अधिकारी सहकार्य करीत नसेल तर तक्रार करावी. त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाणार असल्याचा शब्दही त्यांनी उद्योजकांना दिला. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी, वसाहतीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी योग्य कारवाई केली जाणार आहे. पोलिसांकडून सर्वोतोपरी उद्योजकांना सहकार्य केले जाणार आहे. वाहतूक कोंडीबाबत लवकरच बैठक बोलावून त्यावर तोडगा काढला जाईल. मात्र, उद्योजकांनी कामगारांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना द्याव्यात, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी जयप्रकाश जोशी, मधुकर ब्राह्मणकर, सुधाकर देशमुख, सतीश कोठारी, संजय सोनवणे, राजेंद्र फड यांच्यासह इतरत्र उद्योजकांनी प्रश्न उपस्थित केले.

टपर्‍यांवर अवैध धंदे : अंबड औद्योगिक वसाहतीसह सातपूरमध्ये असलेल्या चहाटपर्‍यांवर सर्रासपणे अवैध धंदे चालतात. यावर कारवाई व्हावी, अशी मागणी उद्योजकांनी केली असता लवकरच मनपा आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई केली जाणार असल्याचे अकुंश शिंदे यांनी सांगितले.

अधिकारी मोबाइलमध्ये व्यस्त : निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळत असलेल्या असहकार्याबद्दल नाराजी व्यक्त केली. न्यायालयाचा निर्णय असतानाही सीईटीपी प्रकल्पावर उद्योजकांना नोटिसा बजावत असल्याचे सांगितले. मात्र, हे सर्व सुरू असताना एमपीसीबीचे अमर दुरगुडे हे मोबाइलमध्ये व्यस्त होते. यावेळी बेळे यांनी आपला संताप अनावर करताना निमंत्रण नाही म्हणून एमपीसीबीचे अधिकारी बैठकीला येत नव्हते, हे माझ्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण होते काय? असेही बेळे म्हणाले.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर ...मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका appeared first on पुढारी.