Site icon

नाशिक : प्रसंगावधानतेमुळे बालिका बिबट्याच्या तावडीतून बचावली

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याने एका बालिकेवर हल्ला केला असून, कुटुंबीय जवळ असल्याने सुदैवाने त्या बालिकेला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यात यश आले आहे. ही घटना राखीव वनालगत घडली आहे.

काही दिवसांपूर्वीच दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील एका शाळकरी मुलगा शाळेतून घरी जात असताना बिबट्याने त्या मुलावर हल्ला केला होता. त्यात त्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचा विसर पडत नाही तोच पुन्हा सोमवारी संध्याकाळी निळवंडी शिवारातील मोराडे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुराच्या सहा-सात वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीचे नाव नीलम गोपीनाथ वातास (7) आहे. शेतमजुरी करण्यासाठी आलेले मजूर मागील 15 दिवसांपासून पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत. रोजप्रमाणे नीलम जेवण करून हात धुण्यासाठी शेडच्या बाहेर आली होती. तितक्यात बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिला फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. नातेवाइकांनी बिबट्याचा जंगलात तब्बल 300 मीटर पाठलाग करून त्या मुलीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. या मुलीला उपचारासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला आहे, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी काळे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रसंगावधानतेमुळे बालिका बिबट्याच्या तावडीतून बचावली appeared first on पुढारी.

Exit mobile version