नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी

मनपा आयुक्त रमेश पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांबाबत प्राप्त हरकतींची गांभीर्याने दखल घेत संबंधित मतदारयादी कर्मचार्‍यांकडून प्रभागातील परिसरात जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. कर्मचारी नि:पक्षपातीपणे काम करत आहे की नाही याविषयी खात्री करण्यासाठी आयुक्त रमेश पवार हे थेट प्रभागांमध्ये जाऊन भेटी देत आहेत.

निवडणुकीची प्रारूप मतदारयादी 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झालेल्या हरकती व सूचना लक्षात घेता आयुक्त पवार यांनी त्यावर प्रभागनिहाय तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करून युद्धपातळीवर काम सुरू आहे. यामध्ये मतदारयादी कर्मचारी हे दबावाखाली काम न करता नि:पक्षपातीपणे काम होण्याच्या दृष्टीने आयुक्त पवारांकडून थेट प्रभागात जाऊन कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाची तपासणी केली जात आहे. पंचवटी विभागातील काही प्रभागांमध्ये आयुक्तांनी भेटी दिल्या. त्याचप्रमाणे रामनाथनगर, चामरलेण्याच्या पायथ्याशी परिसरात कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाची आयुक्त पवार यांनी तपासणी करून स्वत: खात्री केली.

याद्यांवर 3,847 हरकतींची नोंद
प्रारूप मतदारयाद्यांवर मनपाच्या इतिहासात प्रथमच 3,847 इतक्या विक्रमी हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्याने मतदारयादीच संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. सिडको विभागातून सर्वाधिक 2,433 हरकती प्राप्त झाल्या असून, हे हरकतींचे प्रमाण 65 टक्के इतके आहे. प्रारूप मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आणि याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याने विविध राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने 3 जुलैपर्यंत म्हणजे दोन दिवस मुदतवाढ दिली होती. 3 जुलैला 2,725 हरकती दाखल झाल्या. परंतु, रात्री उशिरापर्यंत हरकती नोंदविण्याचे काम सुरू होते. सिडको विभागात अधिक हरकती असल्याने नोंदणीसाठी विलंब लागला.

4 जुलैला हरकतींचा अंतिम आकडा जाहीर करण्यात आला. 2017 च्या निवडणुकीत 2,217 हरकती दाखल झाल्या होत्या.

विभागनिहाय हरकती 

पूर्व  244 , पश्चिम 46
पंचवटी 396, नाशिकरोड 222
सिडको 2433, सातपूर 155
ट्रू व्होटर्स अ‍ॅप -352

हरकती व सूचनांवर योग्य पद्धतीने कामकाज होऊन सर्व प्रभागांतील याद्या सदोष तयार होऊन हरकती व सूचनांचा निपटारा केला जात आहे. तशा सूचना संबंधित कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. – रमेश पवार, आयुक्त, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी appeared first on पुढारी.