Falmashi www.pudhari.news

नाशिक (कवडदरा)  : पुढारी वृत्तसेवा

काकडी, पडवळ, दोडकी अशा फळपिकांवर सध्या मोठ्या प्रमाणात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने फळे सडून शेतकर्‍याचे सध्या मोठे नुकसान होत आहे. यावर इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील येथील तरुण शेतकरी सुनील शेळके यांनी प्लास्टिक बाटली आणि लूर गोळीच्या माध्यमातून स्वस्त असा कामगंध सापळ्याच्या माध्यमातून रामबाण उपाय शोधला आहे. त्याचा आंबा पिकालाही प्रचंड फायदा होणार आहे.

शेळके हे छोट्या प्रमाणात आंबाविक्रीचा व्यवसायही करतात. मागील हंगामात त्यांना आंबा पेट्यांत बहुतांश आंबे खराब निघाल्याचे आढळले. त्यावर विचार करत त्यानी फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंबा फळ खराब होत असल्याचा निष्कर्ष काढला. उपाययोजना शोधण्यासाठी त्यांनी यू-ट्यूबच्या आधारे माहिती संकलित केली. कृषी पदविका मिळविलेले शेळके यांनी सापळा तयार करण्याचा चंगच बांधला. त्यांनी प्लास्टिकच्या बाटलीला वरच्या भागात छोटी छोटी छिद्रे पाडून अर्ध्या भागात रंगीत पाणी भरले. त्यावर लूरची गोळी दोरीच्या साहाय्याने टांगली. लूरच्या वासाने आणि रंगीत पाण्याने माशा बाटलीकडे आकर्षित होतात आणि बाटलीत शिरतात. बाटलीमध्ये असलेल्या लूर गोळीच्या वासाने त्यांना गुंगी येते आणि आपसूक त्या खालच्या पाण्यात पडून मरतात. अशा प्रकारे फळमाशीचा प्रार्दुभाव रोखण्याचा साधा सापळा त्यांनी शोधून काढला. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्‍यांना फळमाशीचे महागडे ट्रॅप विकत घेणे परवडत नाही, त्यांच्यासाठी हे फारच उपयुक्त ठरणार आहे. हा ट्रॅप अत्यंत कमी खर्चात तयार करता येत असल्याने भाजीपाल्याच्या हंगामानंतर आंब्याच्या हंगामात याचा प्रभावी उपयोग होणार आहे. गतवर्षी आंबा बागायतदारांना फळमाशीचा मोठा फटका बसला असल्याने शेळके यांचा हा देशी जुगाड मध्यमवर्गीय शेतकर्‍यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

लूर गोळी म्हणजे काय
ही गोळी मादी माशीचा वास असणारी गोळी म्हणजेच गंधयुक्त रसायन आहे. त्याच्या वासाने नर किडे त्याकडे आकर्षित होतात आणि त्याचा काही अंश खाताच त्यांचा गुंगी येते. शेतीसाठी किटकनाशके तयार करणार्‍या कंपन्या अशी विविध रसायने तयार करतात. त्यातील काही गोळी स्वरूपात असतात.

हेही वाचा :

The post नाशिक : फळमाशीवर भरवीरच्या शेतकर्‍याचा रामबाण उपाय appeared first on पुढारी.