नाशिक : फळविहीरवाडीचा बंधारा दुरुस्त करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश

गिरीश महाजन

नाशिक (सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील अडसरे येथील फळविहीरवाडीतील ढगफुटीमुळे फुटलेल्या पाझर तलावाची राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. तसेच स्थानिक शेतकर्‍यांशी संवाद साधला.

फुटलेला बंधारा तत्काळ दुरुस्त करण्यात यावा. जेणेकरून या भागातील पाणीप्रश्न मार्गी लागेल. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठवावा, अशा सूचना ना. महाजन यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ नेते अशोक महाले, आमदार राहुल ढिकले, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहायक पोलिस निरीक्षक खेडकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

‘म्हैसवळण घाट रस्ता दुरुस्त करावा’
दरम्यान, शेतकर्‍यांना तत्काळ नुकसानभरपाई देऊन त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, म्हैसवळण घाट रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनी दुरुस्ती करून द्याव्यात अशी मागणी शेतकरी दत्तू चौरे, मनोहर चौरे, किरण साबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, तानाजी जाधव, सागर साबळे, संजय झनकर, भरत रायकर, सरपंच सतू साबळे आदींसह शेतकर्‍यांनी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : फळविहीरवाडीचा बंधारा दुरुस्त करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश appeared first on पुढारी.