
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आयटीसी कंपनीची फ्रेन्चाइजी देण्याचे आमिष दाखवून शहरातील एकाला सुमारे सव्वासात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, बँकेने एनईएफटी व्यवहारात आयएफसी कोडची शहानिशा न केल्याने भामट्याला बँकेकडून मदत झाल्याचा आरोप फसवणूक झालेल्या व्यक्तीने केला आहे. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यात व्हॉट्सॲपधारक, बँक खातेधारकांसह दोन राष्ट्रीयीकृत बँकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अविनाश पवार (४८, रा. गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी ९ ऑगस्ट २०२२ ते ६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत इंटरनेट, फोन, व्हॉट्सॲप व ऑनलाइन पद्धतीने सात लाख २९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. अविनाश पवार यांनी आयटीसी कंपनीची फ्रेन्चाइजी घेण्यासाठी संकेतस्थळावर शोध केला. त्यावेळी भामट्यांनी व्हॉट्सॲप व ईमेलद्वारे अविनाश यांच्याशी संपर्क साधला होता. भामट्यांनी त्यांची ओळख प्रदीपकुमार, राकेश त्रिपाठी व चार्ल्स ॲन्टोनी नावाने संपर्क साधला होता. फ्रेन्चाइजी घेण्यासाठी अनामत रक्कम, जीएसटी, प्रॉडक्ट बुकिंग आदी शुल्कांच्या बहाण्याने अविनाश यांच्याकडून सात लाख २९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत घेतले. अविनाश यांनी आर्थिक व्यवहार एनईएफटीमार्फत केला होता. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. १२ ऑक्टोबर २०१२ च्या सर्क्युलरनुसार एनईएफटी व्यवहारात आयएफएससी कोड नमूद केल्यास संबंधित कोड चुकीचा असल्यास तो व्यवहार पुढे न करता ग्राहकांना त्याची माहिती देणे बँकेस बंधनकारक आहे.
मात्र, बँकेने अविनाश यांना कोणतीही माहिती न देता व्यवहार करीत फसवणूक करणाऱ्या भामट्यांना मदत केल्याचा आरोप अविनाश यांनी फिर्यादीत केला आहे. त्यानुसार भामट्यांसह गोविंदनगर येथील स्टेट बँकेची शाखा व कोलकाता येथील पंजाब नॅशनल बँकेच्या सारणी शाखेविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- नाशिक : सिटीलिंक कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत
- आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवे आव्हान; म्हणाले, अधिवेशनापूर्वी…
- पुणे : विद्यापीठ परिसरात वाहतुकीत बदल ; गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना
The post नाशिक : फ्रेन्चाइजीच्या नावाखाली सात लाखांचा गंडा, दोन बँकांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.