नाशिक : बँकमित्राने लाटले दीड कोटी ; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत 32 जणांची फसवणूक

बैंक

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत कार्यरत एका अस्थायी कर्मचार्‍याने तब्बल एक कोटी 50 लाख 37 हजार 450 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने 32 खातेदारांना गंडा घालत बँकेचीही फसवणूक केली आहे. तो फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बँकेचे मालेगाव येथील क्षेत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार बँकेच्या भऊर शाखेत भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर) हा रोजंदारी पद्धतीवर कार्यरत होता. त्याने 2016 पासून ते दि. 8 जुलै 2022 या कालावधीत हा प्रताप केला. 32 खातेदारांचा विश्वास संपादन करित त्याने त्यांच्या खात्यावरील पीककर्जाची रक्कम परस्पर स्वीकारली. तसेच काहींची बचत खात्यावरील रक्कमही घेतली. मात्र बँकेत भरणा केला नाही. संबंधितांना बँकेचा सही-शिक्का असलेल्या स्वलिखित मुदत ठेवीच्या बनावट पावत्या दिल्या. परिणामी, खातेदार आश्वस्त राहिले. अशा पद्धतीने तब्बल 1 कोटी 50 लाख 37 हजार 450 रुपयांचा अपहार केला. काही शेतकरी खातेदार बँकेत गेल्यानंतर त्यांच्या खात्यावरील माहिती घेताना या प्रकाराला वाचा फुटली. आहेरच्या माध्यमातून बँकेचा व्यवहार केलेल्या खातेदारांनी शाखेत धाव घेत तक्रारी नोंदवल्या. या गंभीर प्रकरणाची अंतर्गत चौकशी होऊन अखेर क्षेत्रिय प्रबंधक भोर यांनी पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली.

भादंवि कलम 420, 467, 468, 406, 408, 380 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. भंडाफोड झाल्याची कल्पना येताच संशयित आहेर फरार झाला. सखोल चौकशी केली जात असून, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप लांगेड यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक व्ही. आर. देवरे तपास करत आहेत. दरम्यान, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेत या आर्थिक गैरव्यवहाराची तत्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

दुसरी घटना, तरी बँक निर्धास्त
महाराष्ट्र बँकेच्या बाबतीत जिल्ह्यातील अशी दुसरी घटना आहे. यापूर्वी 2019 मध्ये दाभाडी शाखेतील बँकमित्राने याच पद्धतीने 60 ते 70 खातेदारांना अडीच ते तीन कोटी रुपयांना ठगवले होते. निराधार, परित्यक्त्या व विधवा महिलांचे निराधार योजनेचे पैसे परस्पर काढणे, निरक्षर खातेदारांचे अंगठे घेत त्यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर हाताळण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतरही फसवणूक झालेल्या खातेदारांना अद्यापही न्यायाची प्रतीक्षा आहे. तोच कित्ता भऊरमध्ये गिरवला गेला. एका बँकमित्राने कलाकारी दाखविल्यानंतरही त्यातून बँक व्यवस्थापनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे स्पष्ट होते.

मिरजेत तापाच्या रुग्णांत वाढ 

फसवणुकीची रक्कम बँकेने द्यावी
सहकारी बँक, पतसंस्थेत आर्थिक घोळ झाल्याचे व पैसे बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आता राष्ट्रीयीकृत बँकेतही अपहाराचे प्रकार घडू लागल्याने खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील खातेदार काबाडकष्ट करून पै पै जमवून बँकेत ठेवतात. ते हाताळणारी यंत्रणा रोजंदारीवरील असेल तर त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. बँकेने अपहार झालेली रक्कम संबंधित खातेदारांना तत्काळ मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बँकमित्राने लाटले दीड कोटी ; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत 32 जणांची फसवणूक appeared first on पुढारी.