Site icon

नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बँकांमधील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व सुटसटीत व्हावा याकरिता रिझर्व्ह बँकेकडून बँकांना नाण्यांचा पुरवठा केला जात असतानाच, अफवा अन् डिजिटल पेमेंटमुळे बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चिल्लरचा ढीग पडताना दिसत आहे. शहरात जरी काही प्रमाणात नाणे व्यवहारात दिसत असले तरी, ग्रामीण भागात नाण्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. विशेषत: दहा रुपयांच्या नाण्यांबाबत अनेक अफवा असल्याने, या नाण्यांचा मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये ढीग होताना दिसत आहे.

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद केल्यानंतर दहा रुपयांचे नाणेही चलनातून बाद होईल, तसेच चिन्ह नसलेले नाणी नकली आहेत अशा प्रकारच्या अफवा आजही ग्रामीण भागात पसरविल्या जात आहे. विशेषत: भाजीविक्रेते, छोटे व्यावसायिक, फळवाले, चहा विक्रेते, स्नॅक्स सेंटरचालक यांच्याकडून अजिबातच दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात नाही. परिणामी नागरिकांमध्ये या नाण्यांबाबत प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. वास्तविक दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. विशेष बाब म्हणजे रिझर्व्ह बँकेने याबाबतचा खुलासा करताना व्यवहारात दहा रुपयांच्या नाण्यांचा वापर करावा, अशा प्रकारचे स्पष्टीकरण यापूर्वीच दिले आहे. मात्र, अशातही या नाण्यांबद्दलचा संभ्रम कायम आहे. दुसरीकडे किरकोळ व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रणालीचा वापर केला जात असल्याने, व्यवहारातून चिल्लर जणू काही गायबच झाली आहे. बँकांमधून देखील नोटांची मागणी केली जात असल्याने, चिल्लर पडून राहत आहे. तर व्यापारी, विक्रेत्यांकडे असलेल्या चिल्लरचा मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये भरणा केला जात असल्याने, कोट्यवधी रुपयांची चिल्लर सध्या बँकांमध्ये बघावयास मिळत आहे. काही बँकांमध्ये चिल्लर ठेवावी कुठे? असा जागेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, डोकेदुखी वाढली असल्याचेही चित्र आहे.

वीस रुपयांच्या नाण्याची भर…

अगोदरच एक, दोन, पाच आणि दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिला जात असताना, २० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये पाठवली आहेत. त्यामुळे बँकांची आणखीनच डोकेदुखी वाढली आहे. अगोदरच ही नाणी ग्राहकांकडून स्वीकारली जात नसताना २० रुपयांच्या नाण्याची भर कशासाठी? असा प्रश्नही बँकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका appeared first on पुढारी.

Exit mobile version