नाशिक : बँकेने अपहाराची जबाबदारी स्वीकारावी; महाबँकेच्या भऊर शाखेत फसवणूक झालेल्या पीडितांचा सूर

www.pudhari.news

देवळा : पुढारी वृत्तसेवा
भऊर शाखेतील आर्थिक अपहार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने त्वरित फसवणूक झालेल्या खातेदारांचे पैसे परत करावेत, असा सूर बँकेचे प्रबंधक श्रीराम भोर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उमटला. यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे, अपहार प्रकरणातील तपास अधिकारी व फसवणूक झालेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दि.23 जुलै रोजी भऊर येथे अपहार प्रकरणात फसवणूक झालेल्या खातेदारांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच पुढील आठवड्यात बँकेचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित खातेदारांची बैठक घेऊन ग्राहकांच्या शंकांचे निरसन करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक लावण्यात आली होती. काही कारणास्तव पोलिस अधीक्षक या बैठकीस उपस्थित राहू शकते नाही. परिणामी, कायद्याच्या पातळीवरील शंकांचे निरसन होऊ न शकल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बँक प्रबंधक भोर यांनी बँकेकडे तक्रार केलेल्या अर्जदारांची यादी वाचून दाखवली. कुणी तक्रार शिल्लक राहिला असल्यास त्यांनी येत्या दोन-तीन दिवसांत बँकेकडे अर्ज द्यावेत. तसेच बँकेत तपास केल्यावर ज्यांचे व्यवहार योग्य आहेत, असे निदर्शनास आले असेल त्यांनी आपले तक्रारी अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन देखील शेवटी भोर यांनी केले. दरम्यान, यावेळी बँकेच्या माध्यमातून कुठलेही दिलासादायक ठोस आश्वासन न मिळाल्याने ग्राहकांनी व्यवस्थापनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा:

The post नाशिक : बँकेने अपहाराची जबाबदारी स्वीकारावी; महाबँकेच्या भऊर शाखेत फसवणूक झालेल्या पीडितांचा सूर appeared first on पुढारी.