Site icon

नाशिक : बजेटसाठी जमा-खर्च सादर करण्याचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने तसेच मनपाच्या मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रकल्प थांबल्याने महापालिकेची तूट डिसेंबरअखेर 450 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यामुळे मनपाच्या 2022-23 या वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकासह 2023-24 या आर्थिक वर्षाच्या बजेटवर होणार असल्याने आयुक्तांनी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील जमा-खर्चाची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश खातेप्रमुखांना दिले आहेत.

तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 2227 कोटींचे जमेचे बजेट स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केले होते. बजेटमध्ये मागील मंजूर कामांचे दायित्व 2438 कोटी दर्शविले होते. स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकात 339 कोटी 97 लाखांची वाढ सुचविल्याने अंदाजपत्रकाचा आकडा 2567 कोटी इतका झाला होता. स्थायी समितीने केलेली 339 कोटींची वाढ प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी रद्द केली. यामुळे जवळपास वर्षभर आयुक्तांच्याच बजेटची अंमलबजावणी सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात जीएसटी अनुदानासह नगररचना विकास शुल्क, घरपट्टी, पाणीपट्टी या उत्पन्नाच्या मार्गातून मनपाच्या तिजोरीत 2173 कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित होते. मात्र, ऑक्टोबरअखेर त्यात जवळपास चारशे कोटींची तफावत निर्माण झाली. त्यामुळे आयुक्तांनी नगररचना विभागासह घरपट्टी, पाणीपट्टी विभागाला उत्पन्न वाढविण्याचे निर्देश दिले होते. डिसेंबर 2022 मध्ये सुधारित बजेट सादर करण्यासह 2023-24 या वर्षाच्या नवीन बजेटची तयारी सुरू करण्यात आली असून, त्यासाठी जमा-खर्चाच्या आकडेवारीची माहिती घेतली जात आहे. डिसेंबरअखेर मनपाच्या उत्पन्नाात 450 कोटींची घट निर्माण झाली आहे.

अंदाजपत्रक दोन हजार कोटींचे
विकास शुल्क तसेच विविध परवानग्यांपोटी चालू आर्थिक वर्षात नगररचना विभागाचे 302 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. डिसेंबरअखेर 135 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. घरपट्टीच्या 151 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 80 कोटी, तर पाणीपट्टीच्या 75 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 31 कोटींचा महसूल आतापर्यंत मिळाला आहे. मनपाच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करून 200 कोटींचा महसूल मिळणार होता. मात्र, हा प्रकल्पच रद्द झाल्याने हा महसूल मिळू शकणार नाही. उत्पन्न आणि महसुलाचे प्रमाण पाहता 2023-24 या आर्थिक वर्षाचे बजेट दोन हजार कोटींच्या आतच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बजेटसाठी जमा-खर्च सादर करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Exit mobile version