नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

farmer, शेतकरी

नाशिक : वैभव कातकाडे

अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाशिक कृषी विभागातर्फे पावसाच्या वेळेनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत कृषी विभागाकडून जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्सूनमुळे बळीराजाचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सन २०२३-२४ मध्ये उशिरा पावसाला सुरुवात व नियमित पावसाच्या कालावधीमध्ये खंड याबाबतचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. प्राथमिक मुद्द्यांमध्ये जमिनीत पुरेसा ओलावा असल्यानंतरच पेरणी करावी, आंतरपीक पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा, पीक सरासरीएवढे येण्यासाठी नेहमीपेक्षा साधारणत: २० ते २५ टक्के अधिक बियाण्यांचा वापर करावा, शाश्वत शेती तयार करण्यासाठी नेहमीच्या रासायनिक खतांच्या वापरात किमान २५ टक्क्यांनी कपात करावी, डाळ प्रकारातील मूग, उडीद यांसारख्या पिकांची पेरणी नापेर क्षेत्रावर करावी तसेच कपाशीची लागवड करत असताना ओळींची संख्या कमी करून १ किंवा २ ओळी तुरीच्या घ्याव्यात. खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन पिकाची पेरणी दि. २५ जुलैपर्यंतच करावी व पेरणीसाठी उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरावे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. उशिरा पेरणीसाठी ज्वारीमध्ये बियाण्याचा दर ३० टक्क्यांनी वाढवावा व खोडमाशीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या. उपलब्ध पर्जन्याचा उपयोग करून घेण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण उपाययोजना उताराला आडवी मशागत व पेरणी, रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर इत्यादी उपाययोजना कराव्या. शेतकऱ्यांनी पावसाचा खंड कालावधी लक्षात घेऊन संरक्षित सिंचनाचा वापर करावा. तुषार व ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा. जमिनीत ओलावा राहण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. तृणधान्य पिकांवर २ टक्के युरिया तसेच कापूस व कडधान्य पिकावर २ टक्के डीएपीची फवारणी करावी. पीक संरक्षणासाठी फेरोमोन ट्रॅप्स, निंबोळी अर्क व जैविक घटकांचा वापर करावा आदींबाबत जनजागृती केली जात आहे.

फळबागांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

डाळींब : आच्छादनाचा वापर करावा. सेंद्रिय कुजलेल्या पदार्थांचा वापर करावा. हलकी आंतरमशागत करावी. केवोलिन ८ टक्के किंवा पोटॅशिअम नायट्रेट १ ते २ टक्के फवारणी करावी. १ टक्के बोर्डा मिश्रणाची फवारणी तसेच खोडांना १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी.

आंबा : नवीन लागवड केलेल्या झाडाला सावली करावी. आच्छादनाचा वापर करावा. मटका सिंचनाचा वापर करावा.

द्राक्ष : आच्छादनाचा वापर करावा. हलकी आंतरमशागत करावी. सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा.

वेळापत्रक

पेरणीयोग्य कालावधी – कोणती पिके घ्यावी -कंसातील पिके घेऊ नये

१५ ते ३० जून     –        सर्व खरीप पिके घ्यावी  –

१ ते ७ जुलै         –        सर्व खरीप पिके   –

८ ते १५ जुलै       –     सोयाबीन, मका, सं. ज्वारी,  सं. बाजरी, कापूस,  तूर, तीळ, सूर्यफूल, भात पिके घ्यावी- (भुईमूग, मूग, उडीद ही पिके घेऊ नये)

१६ ते ३१ जुलै      –      सोयाबीन, मका, बाजरी, तूर, भात ही पिके घ्यावी (कापूस, भुईमूग, सं. ज्वारी ही पिके घेऊ नये)

१ ते १५ ऑगस्ट    –      सं. बाजरी, रागी, सूर्यफूल, तूर, भात (हळवा) पिके घ्यावी  (कापूस, सं. ज्वारी, भुईमूग, सोयाबीन ही पिके घेऊ नये)

हेही वाचा :

The post नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक appeared first on पुढारी.