नाशिक बनणार ‘क्वाॅलिटी सिटी, देशातील पहिल्या पाच शहरांत समावेश

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांवर पहिल्या टप्प्यात भर असलेल्या ‘क्वाॅलिटी सिटी नाशिक’ या चळवळीची बुधवारी (दि. १) घोषणा करण्यात आली. स्किल इंडिया अर्थात कौशल भारत कुशल भारत मोहिमेंतर्गत क्वाॅलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ राबविण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी क्वाॅलिटी कौन्सिल ऑफ इंडियासमवेत नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटिझन्स फोरम, श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल , क्वाॅलिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शाह, एनएसडीसीचे सीईओ आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेदमणी तिवारी व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक जितूभाई ठक्कर यांनी दिली. याचा लाभ नाशिकच्या समग्र विकासासाठी निश्चित होईल असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला. वेदमणी तिवारी म्हणाले, ‘क्वाॅलिटी सिटी नाशिक चळवळीशी निगडित असण्याचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो कारण एनएसडीसीमध्ये दर्जेदार कर्मचारीवर्गाची निर्मिती करून कौशल्य विकासाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

नाशिक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण हे चळवळीचे तीन प्रमुख उद्दिष्ट असून, यासाठी नाशिक महानगरपालिका, क्रेडाई नाशिक मेट्रो, सिटिझन्स फोरम, आयमा, निमा, असो. ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजी., इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स, इंडियन मेडिकल असो., बिल्डर्स असो ऑफ इंडिया, नरेडको, कॉम्प्युटर असोसिएशन, नाईस, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, नीता, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयसी एआय, फिक्की, महाराष्ट्र चेंबर्स, तान, निपम, नाशिक स्कूल असोसिएशन, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, केमिस्ट असोसिएशन, रिक्षाचालक संघटना, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, इंडियन प्लम्बिंग असो., नाशिक फर्स्ट, मी नाशिककर, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, असोचेम, कॉर्पोरेटर्स, को-ऑप. बँक फेडरेशन, सामुदायिक संस्था, शासकीय/निमशासकीय विभाग – जिल्हा परिषद, एनएमसी, आदिवासी विकास, महसूल विभाग या सर्वांचे सहकार्य लाभणार आहे.

नाशिक : ‘क्वाॅलिटी सिटी नाशिक’बाबत माहिती देताना जक्षय शाह. खासदार हेमंत गोडसे, समवेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सीईओ आशिमा मित्तल, वेदमणी तिवारी, जितू ठक्कर.

नाशिकचा सन्मान

देशातील शहरांच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी तेथील मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ही चळवळ नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाईल. ही चळवळ पथदर्शी स्वरूपात राहणार असून, पुढे अन्य शहरांमध्येही तिचे अनुकरण केले जाऊ शकेल. या उपक्रमासाठी देशातील पाच शहरांची निवड करण्यात आली असून, त्या शहरातील पहिला सन्मान हा नाशिकला मिळाला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक बनणार 'क्वाॅलिटी सिटी, देशातील पहिल्या पाच शहरांत समावेश appeared first on पुढारी.