
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळी सुट्टी सुरू होताच बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या बसस्थानकांमध्ये चोरट्यांचा वावर वाढला असून, प्रवाशांकडील किमती ऐवजावर डल्ला मारत असल्याचे प्रकार समोर आले आहे. महिनाभरात चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे.
जुने सीबीएस येथे मंगळवारी (दि.९) सायंकाळी पाच वाजता चेतनराम गोकुळ शेवाळे (४४, रा. इंदिरानगर) यांच्याकडील ११ हजार रुपयांचे परकीय व भारतीय चलन, बँकांचे डेबिट व क्रेडिट कार्ड तसेच महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बसस्थानकांवरील चोरट्यांचा वावर आणि चोऱ्या हा प्रश्न उपस्थित झाला. याआधीही चोरट्यांनी गर्दीचा फायदा प्रवाशांकडील महागडे मोबाइल, सोन्याचे दागिने, रोकड असा लाखाे रुपयांचा ऐवज लंपास केला. त्या चोरट्यांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने चोरीचे प्रकार थांबत नसल्याचे बोलले जात आहे.
ठक्कर बाजार चोरट्यांचा अड्डा
याआधी ४ एप्रिलला ठक्कर बाजारमधून ३० हजार रुपयांचा मोबाइल आणि महामार्ग बसस्थानकातून एक लाख ३९ हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरट्यांनी चोरली. तर जुने सीबीएस येथे १५ एप्रिलला ६० हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्याचप्रमाणे नाशिकरोड बसस्थानकातून ५ मे रोजी ३२ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले. तर जुने सीबीएस येथून ७ मे रोजी ५५ हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लंपास केले.
सीसीटीव्ही बंद
कोरोना प्रादुर्भाव असताना बसस्थानकांवरील सुरक्षारक्षक कमी करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर त्यांची पुन्हा नेमणूक न झाल्याने बसस्थानकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे बसस्थानक आवारातील सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांना त्याचा अप्रत्यक्ष फायदा होत असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :
- IPL 2023 : असे असेल प्ले-ऑफचे गणित!
- श्रीगोंद्यामध्ये 82 हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त
- shark : ‘सैतानी’ शार्क माशाचा शोध
The post नाशिक : बसस्थानकांत वाढला चोरट्यांचा वावर, महिनाभरात पाच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.