
चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा राग मनात धरत एका अल्पवयीन भावाने ३२ वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत आणि स्कार्फने गळा आवळून तिचा निर्घृण खून केला. एवढेच नव्हे तर दोरीच्या सहाय्याने फरफटत ओढत नेऊन तिच्या मृतदेहावर उसाचे पाचट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
हृद्य पिळवटून टाकणारी घटना चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथे शनिवारी (दि. ८) सकाळच्या सुमारास घडली. या खून प्रकरणी मृत महिलेचा पती संदीप पवार (वय ३५) याने वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी काही तासांत अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.
याबाबत वडनेरभैरव पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील पाथर्डी सालभोये येथील संदीप काशीराम पवार (३५) व पत्नी वैशाली (३२) हे दोघे धोंडगव्हाणवाडीत शिवाजी बस्ते यांच्याकडे शेतमजुरीचे कामकाज करतात. वैशाली पवार यांचा मामेभाऊ विलास पिठे हा त्यांच्याकडे नेहमी भेटायला यायचा. पवार यांच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन भावाच्या बहिणीसोबत विलास पिठे याचे दोन ते तीन वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते. बहिणीचे प्रेमसंबंध वैशाली पवारनेच जुळवून दिल्याचा राग मनात धरून अल्पवयीन भावाने वैशाली पवार हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर स्कार्फच्या सहाय्याने गळा आवळून तिचा खून केला. मृत महिलेचे शरीर दोरीच्या सहाय्याने १०० फूट लांब ओढत नेऊन तिच्यावर उसाचे पाचट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार शनिवारी (दि. ८) सकाळी ११ दरम्यान बस्ते यांच्या द्राक्षबागेत घडला. या घटनेची माहिती वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस उपनिरीक्षक परसराम तांगड यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून काही तासांत अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. या खून प्रकरणी अल्पवयीन संशयितास वडनेरभैरव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक परसराम तांगड करीत आहेत.
हेही वाचा :
- Raining Havoc : उत्तर- पश्चिम भारतात पावसाचा कहर; भूस्खलन, ढगफुटीमुळे ३४ लोकांचा मृत्यू
- पवार साहेब, कुठे कुठे जाऊन माफी मागणार? छगन भुजबळांचा प्रतिसवाल
- पुतण्यापासून वाचवा म्हणण्याची वेळ शरद पवार यांच्यावर : खोत
The post नाशिक : बहिणीचे प्रेमसबंध जुळवून दिल्याच्या रागातून महिलेचा खून appeared first on पुढारी.