नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने

Baspa www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

मनपाच्या नाशिकरोड येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या सर्वसुविधायुक्त चार मजली इमारतीचे काम सन २०१८ मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही या रुग्णालयात सर्वसामान्यांना आवश्यक नागरी सुविधा मिळत नाहीत. याविरोधात बहुजन समाज पक्षाच्या वतीने मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय निदर्शने करण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री आहे. त्यामध्ये एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी एक्स-रे, मॉलिक्युलर प्रयोगशाळा तसेच 600 खाटा आदींचा समावेश आहे. मात्र, प्रशाकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे ही यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप बसपाने केला आहे. नाशिकरोडचे ठाकरे रुग्णालय हे शासकीय असल्याने सर्व जाती-धर्माचे रुग्ण येतात. फलकावर हिंदू धर्माच्या उल्लेखामुळे धर्मनिरपेक्ष लोकशाहीची अवहेलना होत आहे. त्यामुळे ‘हिंदू हृदयसम्राट’ हे विशेषण काढून टाकण्याची मागणी बसपाने केली आहे. आंदोलनात प्रदेश महासचिव शांताराम तायडे, जिल्हाध्यक्ष लालचंद शिरसाठ, शहराध्यक्ष अरुण काळे, धर्मेंद्र जाधव, महादेव नाथभजन, मच्छिंद्र आहिरे, दीपक औटे, किशोर जाधव, देवीदास तेजाळे आदी उपस्थित होते.

…अन्यथा आक्रोश मोर्चा :

सध्या सर्वत्र तापाची साथ पसरली असून, त्यातच कावीळ, मलेरिया, डेंग्यू यासारख्या संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग व इतर कक्ष तत्काळ सुरू करावे. अन्यथा मनपा विभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा बसपाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने appeared first on पुढारी.