Site icon

नाशिक : बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक; क्रेडाईतर्फे हेल्पलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. बांधकाम कामगार बांधकाम उद्योगाचा अविभाज्य घटक असून, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित कामगार कृतज्ञता सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

या सप्ताहात कामगार नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण आणि समुपदेशन आदी विविध उपक्रम राबविले. बांधकाम कामगारांसाठी फक्त सप्ताह नाही तर रोजच कामे चालू राहतील. नोंदणीसाठी 7887898901 हा हेल्पलाइन नंबर (Helpline Number) दिला असून, या नंबरवर संपर्क केल्यास नोंदणीसाठी मार्गदर्शन केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. क्रेडाई नाशिक मेट्रोचे सचिव गौरव ठक्कर म्हणाले की, कामगारांचे मेसन, बार बेंडर, कारपेंटर या विविध ट्रेडमध्ये आरपीएल प्रशिक्षणाअंतर्गत 30 कामगारांच्या बॅचेसची सुरुवात झाली आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या कामगारांना प्रमाणपत्र दिले गेले. मजूर नोंदणीचे फायदे कामगारांना समजावून सांगण्यात आले. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचे माहितीपत्रक वेगवेगळ्या साइटवर सुमारे दहा हजार कामगारांपर्यंत पोहोचविले. सोबतच महात्मा फुले, जनधन योजना तसेच इन्शुरन्स, मेडिक्लेम यासंबंधी सर्व कामगारांना माहिती दिली गेली. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा भुतडा यांनी बांधकाम कामगार महिलांची तपासणी केली. क्रेडाई राष्ट्रीयचे घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर यांनी कामगारांसाठी असलेल्या विविध प्रशिक्षणांची माहिती दिली. माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी पंतप्रधान आवास योजनेची माहिती दिली. क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल यांनी क्रेडाई अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या विविध 66 शहरांत हा सप्ताह यशस्वीरीत्या राबविल्याचे सांगितले. सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, अनिल आहेर यांनी उपक्रमांचे नियोजन केले. कमिटी सदस्य सतीश मोरे, विजय चव्हाणके, ऋषिकेश कोते, मनोज खिंवसरा, सचिन बागड, अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सागर शहा, सुशील बागड, हंसराज देशमुख यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post नाशिक : बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक; क्रेडाईतर्फे हेल्पलाइन appeared first on पुढारी.

Exit mobile version