नाशिक : बाई, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका..! विद्यार्थ्यांची विनवणी

शालिनी पगार,www.pudhari.news

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर येथील प्रभारी मुख्याध्यापकपदाच्या कालावधीत शालिनी पगार यांनी उत्कृष्ट सेवा दिली. त्यांच्या पुढाकाराने विद्यार्थी संख्या वाढली. तसेच मुलांचे शाळेत दररोज येण्याचेही प्रमाण वाढले. विद्यार्थ्यांशी जवळीक वाढलेल्या पगार यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांना रडू आले अन् त्यांनी रडतच ‘बाई आम्हाला सोडून जाऊ नका’ अशी विनवणी केली. या भावनिक प्रसंगी मुख्याध्यापक पगार यांचेही डोळे पाणावले अन् त्यांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दरम्यान त्यांची नामपूर येथील तळवाडे-भामेर शाळेत बदली झाली आहे.

शालिनी देवरे (पगार) यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीही प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तसेच डीबीटीबाबत १०० टक्के काम पूर्ण केले होते. याबरोबरच इयत्ता पहिली ते चौथी या इतर वर्गातील विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी केवळ दोनच वर्षे बाकी असताना त्यांची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर येथून बदली झाली. त्यांनी शासनाकडे वा वरिष्ठ कार्यालयाकडे सेवेची केवळ दोनच वर्षे सेवा बाकी असून, याच ठिकाणी कामाची संधी देण्याची विनंती केली असती तरी कदाचित बदली थांबली असती. मात्र, शासनाचा आदेश सर्वोच्च मानत त्या बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्या.

प्रभारी मुख्याध्यापकपदाच्या कालावधीत वरिष्ठ कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रत्येकवेळी सहकार्य लाभले, मार्गदर्शन मिळाले. यापुढेही ज्ञानदानाचे काम असेच सुरू राहील.

– शालिनी देवरे (पगार) मुख्याध्यापिका

हेही वाचा ;

The post नाशिक : बाई, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका..! विद्यार्थ्यांची विनवणी appeared first on पुढारी.