Site icon

नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात पाच कोटींची वाढ : प्रशासक फयाज

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर 2021 मध्ये 11 कोटी 93 हजार रुपये उत्पन्न झाले होते. एप्रिल ते डिसेंबर 2022 या महिन्यात 14 कोटी 39 लाख उत्पन्न मिळाले होते. यात मागील वर्षीच्या तुलनेत तीन कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली. तसेच एक कोटी 66 लाख रुपयांची खर्चात कपात यामुळे उत्पन्नात एकूण चार कोटी 96 लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांनी दिली.

नाशिक मुख्य मार्केट यार्डामध्ये गाळ्यांच्या उत्पन्नात 24 लाख 15 हजार 641 रुपयांची वाढ झाली, तर पेठ रोड मार्केट यार्डात 15 लाख 11 हजार 834 रुपयांची वाढ झाली. इतर 51 लाख 28 हजार 906 रुपये उत्पन्न झाले असून, फ्रूट मार्केटमध्येही प्रतिदिन वसुलीत वाढ झाली आहे. तसेच मुख्य मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावर होणारी बाजार शुल्काची वसुलीदेखील वाढली आहे. एफसीआयकडे थकीत असलेले बाजार शुल्क 41 लाख 36 हजार 604 रुपये पत्रव्यवहार करत वसूल केले आहे. पेठरोड येथील पक्के गाळे तसेच पंचवटी मार्केट यार्ड येथील पक्के व पत्र्यांचे गाळे यांचे थकीत असलेले भाडे वसूल करण्याचे आदेश कर्मचार्‍यांना देण्यात आलेले आहेत. बाजार समितीच्या खर्चात एक कोटी 66 लाख रुपयांनी खर्चात कपात करण्यात आली आहे. कर्मचारी पगार, स्वच्छता, सुरक्षा याव्यतिरिक्त अन्य कोणताही खर्च केला जात नसल्याचे मुलानी यांनी सांगितले.

शासकीय देणी दिली
प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कृषी पणन मंडळाची बाजार समितीकडे असलेली मागील थकीत असलेली अंशदानाची सुमारे 63 लाख 99 हजार 923 रुपये व चालू अंशदान 81 लाख 233 रुपये असे एकूण एक कोटी 45 लाख रुपये पणन मंडळास अदा केले आहेत. तसेच शासनाची फी 61 लाख 69 हजार रुपये व टीडीएस रक्कम 81 हजार रुपये असे एकूण दोन कोटी 70 लाख रुपये शासनास अदा करण्यात आले आहेत.

सिक्युरिटी खर्चात कपात
बाजार समितीच्या सिक्युरिटी एजन्सीचा कालावधी डिसेंबर 2022 मध्ये संपुष्टात आल्याने सिक्युरिटी सेवा बंद केली. बाजार समितीमध्ये कार्यरत असलेले शिपाई व पहारेकरी यांच्या कामकाजाचे नियोजन करून त्यांच्याकडूनच कामे करून घेतली आणि दरमहा सिक्युरिटीवर होणारा एकूण खर्च सात लाख 72 हजार वाचविण्यात आला आहे. त्यामुळे 2023 च्या अखेरीस 92 लाख 67 हजारांची बचत झाली.

सामाजिक जाणिवेतून उपक्रम
प्रशासक फयाज मुलानी यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात पदभार स्वीकारला. बाजार समितीतील सचिव अरुण काळे, सहायक सचिव एन. एल. बागूल, पी. एन. घोलप, अभियंता रामदास रहाडे, सॅनिटरी निरीक्षक व कर्मचारी यांना समवेत घेऊन सामाजिक जाणिवेतून बाजार समितीत नेत्रतपासणी, सर्वरोग निदान शिबिर, एड्स जनजागृती पथनाट्य, सीमाशुल्क पथनाट्य असे विविध उपक्रम समाजातील सर्व घटकांसाठी राबविले.

हेही वाचा:

The post नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात पाच कोटींची वाढ : प्रशासक फयाज appeared first on पुढारी.

Exit mobile version