नाशिक बाजार समितीत आता ‘एंट्री पास’;’एक गाडी, एक शेतकरी’ नियम

म्हसरूळ (जि.नाशिक) : वर्दळीचे ठिकाण असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून, बाजारघटकांना पास बंधनकारक केला आहे. तसेच, सुरक्षारक्षकांच्याही संख्येत वाढ केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे. 

गर्दी नियंत्रणासाठी कडक उपाययोजना; सुरक्षारक्षकही वाढविले 
नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नाशिक बाजार समितीत जिल्हाभरातून फळभाज्या, पालेभाज्या, कांदा- बटाटा खरेदी-विक्रीसाठी रोज हजारो शेतकरी येत असतात. तसेच, नाशिकसह काही मुंबईचे व्यापारीही बाजार समितीत येत असतात. हमाल-मापारी आदींची मोठी गर्दी होत असते. भरेकरीही बाजार समितीतून पालेभाज्या व फळभाज्या घेऊन जात असतात. त्यामुळे गर्दी होत असते. मात्र, कोरोनाकाळात गर्दी वाढू नये, ही बाब लक्षात घेऊन सभापती पिंगळे यांनी तत्काळ बाजार समिती प्रशासनाला खबरदारीच्या सूचना देत कठोर पावले उचलली. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांची नेमणूक करून आवारात शेतकरी, व्यापारी, मापारी व हमालांना ‘नो मास्क नो एंट्री' हा नियम कडक केला. बाजार समितीच्या घटकांव्यतिरिक्त इतरांना व लहान मुले, वयोवृद्धांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

‘एक गाडी, एक शेतकरी’ यावे

भाजीपाला व फळभाज्या घेऊन येणारी ‘एक गाडी, एक शेतकरी’ यावे, असे नियम केले आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे सामाजिक अंतर ठेवा, मास्क वापरा, विनाकारण जास्त वेळ थांबू नका, अशा सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. बाजार समितीत येणारे व्यापारी, आडते, हमाल-मापारी यांना पास बंधनकारक आहे. बाजार समितीच्या आवारात प्रवेश करताना पास दाखविल्यास प्रवेश देण्यात येत आहेत. पास नसल्यास प्रवेशास मनाई आहे. बाजार घटकांनी पासचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणखी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. सचिव अरुण काळे, स्वच्छता निरीक्षक रवींद्र तुपे व सुरक्षारक्षकांनी उपाययोजनांसंदर्भात सभापती पिंगळे यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली. 
 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

नाशिक महापालिका आणि पंचवटी पोलिस ठाणे, बाजार समिती यांच्या संयुक्त नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता अनावश्यक गर्दीत बरीच घट झाली आहे. आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे. तसेच शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. शासन व बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे. 
-देवीदास पिंगळे, सभापती, बाजार समिती, नाशिक