नाशिक बाजार समितीत कोट्यावधींचा घोटाळा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

सिडको (जि.नाशिक) : नाशिक बाजार समितीचे संचालकांसह सचिव अशा एकूण १२ जणांवर गाळेधारकांकडून वसूल करणे व कोरोना काळात वाटण्यात आलेल्या अन्नधान्याच्या पाकीट वाटपातही एकूण एक कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचे समितीचे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, समितीमध्ये झालेला भ्रष्टाचाराबाबत माजी सभापती आणि तक्रारदार शिवाजी चुंभळे यांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. 

दोषींवर फौजदारी दाखल करण्याची शिवाजी चुंभळेंची मागणी 
बाजार समितीमधील तात्पुरते गाळेधारक संचालक संदीप पाटील यांच्याकडून बाजार समितीने भाडे आकारणी केली नसल्यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यास सचिव अरुण काळे जबाबदार असून, बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच टॉमेटो मार्केटमधील तात्पुरते ११० गाळे उभारले असून, गाळेधारकांकडून वार्षिक ३५ हजार रुपयेप्रमाणे भाडे आकारणी केली होती; परंतु वसूल केलेल्या भाडेबदल्यात एकाही व्यापाऱ्याला बाजार समितीची पावती देण्यात आली नाही. ही रक्कम बाजार समितीकडे जमा न झाल्यामुळे बाजार समितीचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यास सचिव अरुण काळे जबाबदार असल्याचा आरोप चुंभळे यांनी केला आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

 एक कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अहवाल 

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अन्न-धान्याच्या पाकिटांचे वाटप करण्यातही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. आजी-माजी सभापतींसह नऊ संचालक आणि सचिवांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करून अहवाल तयार करून जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला आहे. या सर्व अहवालातील ठळक बाबींमुळे बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हिताची राहिली नसून राजकारणी, संचालक आणि व्यापाऱ्यांच्या हाताचे बाहुले झाल्याचे दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना