नाशिक बाजार समितीत २५ टक्के आवक घटली; भारत बंदचा परिणाम

म्हसरूळ (नाशिक) : शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून बहुजन शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला नाशिक बाजार समितीने पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सभापती देवीदास पिंगळे यांनी बाजार समिती सुरू ठेवली होती. मात्र, या भारत बंदचा परिणाम बाजार समितीच्या दैनंदिन व्यवहारावर झाला असून, जवळपास २५ टक्के आवक घटली आहे. 

केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करून देशात आधारभूत किमतीचा कायदा करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या तरतुदीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा, या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी (ता. २६) भारत बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकमधील बहुजन शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना पत्र दिले आहे. भारत बंद आंदोलनास पाठिंबा जाहीर करून बाजार समिती सुरू ठेवण्यात आली. परंतु बंदच्या भीतीने शुक्रवारी बाजार समितीकडे बऱ्याच शेतकऱ्यानी पाठ फिरवली. या मुळे शेतमाल आवकेत जवळपास २५ ते ३० टक्के घट झाल्याची समजते. परंतु बाजार समितीत आलेला शेतकरी मात्र शेतमाल विक्री करूनच घरी परतला. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

...यामुळे बाजार समिती होती सुरू 

कोरोनासारख्या महामारीने आधीच होरपळलेला शेतकरी अवकाळी, गारपीट या संकटांनाही तोंड देत आहे. हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. कर्जाच्या ओझ्याने शेतकरी दबला गेला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला शेतमाल घेऊन चार पैसे मिळतील, या आशेने शेतकरी बाजार समितीत येत असतात. मात्र अशातच बाजार समिती बंद ठेवली तर त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुळे बाजार समिती सुरू ठेवली होती. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

बाजार समितीत फळभाज्या घेऊन निघालो. शेतकरी संघटनेतर्फे भारत बंद पुकारले होते. शेतमाल विक्री होतो की परत जाव लागेल, अशी धास्ती होती. परंतु बाजार समिती ही सुरळीत सुरू होती. शेतमाल विक्री करून पैसे घेऊन घरी परतलो. 
-मंगेश शार्दूल, शेतकरी