नाशिक बाजार समिती चौकशी प्रकरण : जिल्हा उपनिबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात 

म्हसरूळ (जि. नाशिक) : जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नाशिक बाजार समितीच्या सभापतींसह ११ संचालक व सचिवांकडून एक कोटी १६ लाख रुपयांच्या वसुलीचे आदेश ज्या तक्रारीवरून दिले आहेत, तो तक्रारदारच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाचा सविस्तर>> 

तक्रारदारच गायब!  

नाशिक बाजार समितीच्या आवारातील गाळेधारकांकडून भाडे वसूल करून ते बाजार समितीच्या खात्यात जमा केले जात नव्हते, अशी तक्रार सिद्धपिंप्री येथील रामनाथ सखाराम ढिकले यांनी सहनिबंधक कार्यालयाकडे केली होती. यावरून बाजार समितीच्या निधीच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून सुरगाणा येथील चौकशी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक माधव शिंदे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर केला होता. त्या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी सोमवारी (ता. ५) सभापती देवीदास पिंगळे यांच्यासह ११ संचालक व सचिव अरुण काळे यांच्याकडून एक कोटी १६ लाख ५७ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या प्रकरणातील तक्रारदार रामनाथ ढिकले संबंधित पत्त्यावर राहत नसल्याचे उघड झाले आहे. तसा दाखला सिद्धपिंप्री ग्रामपंचायतीने दिला आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

प्रकरणाला वेगळेच वळण.  

या संदर्भात बाजार समितीने तक्रारदाराचा शोध घेतला असता, याचिकेतील पत्त्यावर संबंधित तक्रारदार वास्तव्यासच नसल्याचा दाखला संबंधित ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 

एक ना अनेक प्रश्न!

तक्रार दाखल झाल्यानंतर सहनिबंधक कार्यालयाने तक्रारदाराची खातरजमा केली होती की नाही? कधी तक्रारदाराला तक्रारीसंदर्भात शहानिशा करण्यासाठी आपल्या कार्यालयात बोलावले होते की नाही? की कुणाच्या सांगण्यावरून हे आदेश देण्यात आले, असे एक ना अनेक प्रश्न बाजार समिती वर्तुळात उपस्थित केले जात आहेत. 

 

संबंधित प्रकरण २०१९ चे असून, सहनिबंधक कार्यालयाकडे या संदर्भात तक्रार आली होती. तेव्हा त्या कार्यालयाने चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. त्यानुसार आमच्या कार्यालयाकडे चौकशी अहवाल प्राप्त झाला. त्यानुसारच मी आदेश दिले. तक्रारदाराबाबत शहानिशा करण्याचे काम त्या कार्यालयाचे आहे. 
-सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक. 

 

 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात