नाशिक : बाप्पाच्या आगमनाने वाहन बाजारात चैतन्य, बुकिंगचा धडाका

वाहन बाजार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या गणरायाचा उत्सव म्हणजे सबंध बाजारावरील विघ्न दूर करणारा असतो. सध्या बाजारपेठेत चैतन्यमय वातावरण असून, वाहन बाजारातही चैतन्य पर्व सुरू झाले आहे. सध्या वाहन बाजारात बुकिंगचा धडाका सुरू असून, गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर अनेकांच्या अंगणात नवी वाहने बघावयास मिळणार आहेत. दरम्यान, 31 ऑगस्टला आपल्या ग्राहकांना डिलिव्हरी देण्याचे आव्हान विक्रेत्यांसमोर निर्माण झाले आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या उत्सवासाठी सबंध नाशिकनगरी सज्ज झाली आहे. गणरायाच्या आकर्षक आणि सुबक मूर्ती बाजारात दाखल झाल्या असून, ग्राहकांचे लक्ष आकर्षित करीत आहेत. त्याचबरोबर बाजारपेठही सजली असून, विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांकडून गर्दी होत आहे. गणरायाचा उत्सव सर्वच क्षेत्रांना झळाळी देणारा ठरत असल्याने, सध्या सर्वत्र उत्सवी वातावरण दिसून येत आहे. छोट्या कारागिरापासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वच ठिकाणी सध्या ग्राहकांचा जोर वाढला आहे. शहरातील दुचाकी तसेच चारचाकीच्या शोरूममध्येदेखील ग्राहक गर्दी करीत आहेत.

कोरोनाच्या संकटात ऑटोमोबाइल क्षेत्रालादेखील मोठा फटका बसला होता. त्यामुळे विघ्नहर्त्याचा उत्सव या क्षेत्रावरील विघ्न दूर करणार, असेच काहीसे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात व आंतरराष्ट्रातीय स्तरावर चिप कंडक्टरचा मोठा तुटवडा असल्याने, वाहननिर्मितीत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बहुतांश वाहनांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांचे वेटिंग आहे. अशात गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर डिलिव्हरी देण्याचे आव्हान विक्रेत्यांसमोर उभे ठाकले आहे.

मोपेड अन् एसयूव्ही वाहनांना पसंती
दुचाकीमध्ये मोपेड, तर चारचाकीमध्ये एसयूव्ही वाहनांना मोठी पसंती आहे. सध्या एसयूव्ही कारची मोठी क्रेझ आहे. विशेषत: तरुणाईकडून या कारला पसंती दिली जात आहे. त्याचबरोबर मोपेड दुचाकीची खरेदी जोरात आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक दुचाकींनाही पसंती दिली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बाप्पाच्या आगमनाने वाहन बाजारात चैतन्य, बुकिंगचा धडाका appeared first on पुढारी.