नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर भागातील विनयनगर येथे बिनशेती परवानगी न घेता तसेच लेआउट मंजूर नसतानाच १३ एकर भूखंडावर बांधकामाचा सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे मनपाने अशा प्रकारचे बांधकाम पूर्ण झालेल्या घरांना नळजोडणी देत इतर पायाभूत सुविधादेखील उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या नगर रचना आणि अतिक्रमण विभागाकडून या बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकांचे फावत आहे. याच भागात महापालिकेच्या उद्यान विभागाचा फलक लावून महापालिकेचे काम सुरू असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करत त्या आडून बांधकाम केले जात असल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिला आहे. नाशिक शिवारातील विनयनगर येथे सर्वे्ह क्रमांक ८६६/१/१ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृतपणे बांधकाम सुरू आहे. भूखंडाचे बिनशेतीमध्ये रूपांतर न करता तसेच लेआउट मंजूर नसताना प्लॉट पाडून बेकायदेशररीत्या विक्री करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. इनामी प्रकारच्या या जागेवर पक्के बांधकाम केले जात आहे. यासंदर्भात महापालिकेने भूखंडावर चालू असलेल्या बांधकामांना नोटीस बजावली. मात्र, हा फक्त कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात आला आहे. अनाधिकृत बांधकामासंदर्भात तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती. त्यावर पवार यांनी तातडीने कारवाईच्या सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या होत्या. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. स्थानिक पातळीवर दाद मिळत नसल्याने तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विनयनगर रहिवासी संघातर्फे निवेदन देण्यात आले. परवानगी न घेताच एकीकडे बांधकाम तर दुसरीकडे मात्र येथील घरांना पाणीपुरवठा, रस्ते या सुविधा दिल्या गेल्या. यामुळे मनपाच्या भूमिकेविषयीच संशय व्यक्त केला जात आहे.

विविध संस्थांकडून विरोध

सादिकनगरमधील सर्वे्ह क्रमांक ८६६/१/१ मध्ये उद्यान विभागाचा फलक लावण्यात येऊन बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु, याबाबत माहिती घेतली असता उद्यान विभागाचे कोणतेही कामकाज सुरू नसल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या फलकाच्या आडून आपले इप्सित साध्य केले जात असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणली आहे. यासंदर्भात विनयनगर ज्येष्ठ नागरिक संघ, राधावल्लभ बहुउद्देशीय संस्था, श्री सप्तश्रृंगीदेवी सामाजिक सांस्कृतिक मंडळ, श्री पंचमुखी हनुमान देवस्थान, श्री सिध्दिविनायक मित्रमंडळ, शिवपंचायतन हनुमान मंदिर यासह विविध संस्थांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे तक्रार करत बांधकाम हटविण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा appeared first on पुढारी.