नाशिक : बिबट्याच्या संचाराने दिंडोरी परिसरात घबराट, शेतीकामांवर परिणाम

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील जाधव वस्ती, निळवंडी, हातनोरे, मडकीजांब परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. शेतकर्‍यांच्या शेळ्या, बैल, गायी, पाळीव कुत्रे, मांजरे आदी प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. मागील महिन्यात निळवंडी येथे एका शाळकरी विद्यार्थ्याचा बळी घेतला. ही घटना ताजी असताना आता हे बिबटे मानव वस्तीकडे येत असल्याने दिंडोरीलगत असणार्‍या जाधव वस्तीकडे हे बिबटे नागरिकांना आढळून आले आहेत. त्यामुळे वस्तीतील नागरिकांना घराबाहेर पडावे की नाही? असा प्रश्न पडला आहे. शिवाय शेतकर्‍यांना शेतामध्ये जाण्यासाठीही भीती वाटत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या भागात या बिबट्याचे दर्शन होत असतानाही संबंधित खात्याकडून अजूनही या बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी निळवंडी येथे एका बिबट्याचे बछडे व मादी आढळून आल्याने या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले होते. त्यावेळी या मादीला पकडण्यात वनविभागाला यश आले होते. तरी संबंधित अधिकार्‍यांनी जाधव वस्ती परिसरात तत्काळ पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी वनविभागाला निवेदन देऊन केली आहे.

जाधव वस्ती व पिंगळ वस्ती परिसरात पहिल्या टप्प्यात तातडीने सुमारे 30 सौरदीप बसवण्यात येणार असल्याचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी सांगितले. मागील महिन्यात निळवंडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा ठार झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी मुलांना शाळेत बरोबर घेऊन जावे व यावे, तसेच मुलांना शाळेत एकटे जाऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बिबट्याच्या संचाराने दिंडोरी परिसरात घबराट, शेतीकामांवर परिणाम appeared first on पुढारी.