Site icon

नाशिक : बिर्‍हाड आंदोलनासाठी गावोगावी बैठका; जिल्हा बँकेविरोधात शेतकरी आक्रमक

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुलीविरोधात 16 जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर काढण्यात येणार्‍या बिर्‍हाड मोर्चासाठी शेतकर्‍यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी गावोगावी बैठका घेतल्या जात असून, याला शेतकर्‍यांकडून प्रतिसाद मिळत आहे.

बँकेच्या वतीने थकबाकी वसुलीविरोधात मोहीम सुरू असून, जिल्ह्यात शेतकरीवर्ग एकवटला आहे. जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकर्‍यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकर्‍यांनी जेवढे कर्ज घेतले त्याच्या अनेक पट या बँकेने व्याज लावल्यामुळे शेतकर्‍यांची मुद्दल आणि व्याज हे जमिनीच्या किमतीपेक्षादेखील जास्त झाले आहे. सतत अवकाळी, कोरोना, पडलेले बाजारभाव यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यात जिल्हा बँकेने आवाजावी व्याज लावून शेतकर्‍यांना अडचणीत आणल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. यामुळे जिल्ह्यात साधारण 50 हजारांपेक्षा जास्त शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. या विरुद्ध नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीने 16 तारखेला पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर बिर्‍हाड आंदोलन पुकारले आहे. यात सरकारने राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे ओटीएस करण्याचे आदेश जिल्हा बँकेला द्यावे. मुद्दल अधिक योग्य व्याज घेऊन शेतकर्‍यांना कर्जमुक्त करावे आदी मागण्या केल्या जाणार आहेत. या आंदोलनासाठी गंगाधर निखाडे, प्रशांत कड, वसंत कावळे, संतोष रेहरे, भोजराज चौधरी यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर आंदोलनाला स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे मार्गदर्शन करीत आहेत.

राजू शेट्टी यांची उपस्थिती
बँकेने 16 तारखेपर्यंत सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही. तर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी लाखोंच्या संख्येने बिर्‍हाड घेऊन मालेगाव येथे पालकमंत्र्यांच्या दारात बसतील. न्याय मिळेपर्यंत तिथून कोणी उठणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बिर्‍हाड आंदोलनासाठी गावोगावी बैठका; जिल्हा बँकेविरोधात शेतकरी आक्रमक appeared first on पुढारी.

Exit mobile version